मुंबई -मुंबई महापालिकेने (BMC) आपोया शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी इंग्रजी, सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या शाळा सुरू केल्या आहेत. या शाळांना पालकांचा भरघोस प्रतिसाद मिळत असल्याने सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या १२ शाळांमध्ये ज्युनियर केजी आणि नर्सरी या वर्गाच्या अतिरिक्त तुकड्याना मान्यता दिली आहे. यामुळे ९६० जागा उपलब्ध झाल्या असून १० एप्रिलपर्यंत पालकांना ऍडमिशन घेता येणार असल्याची माहिती पालिकेच्या शिक्षण विभागाने दिली.
शाळांचा दर्जा सुधारला -मुंबई महापालिकेच्या शाळांमधील शिक्षणाचा दर्जा खराब असल्याची टीका नेहमी केली जात होती. शिक्षणाचा दर्जा खराब असल्याने विद्यार्थी संख्या घटत होती. पालक आपल्या मुलांना पालिका शाळांऐवजी खासगी शाळांमध्ये शिकवणे पसंद करू लागले. यामुळे पालिका शाळा ओस पडू लागल्या होत्या. पालिका शाळांना पुन्हा चांगले दिवस यावेत म्हणून इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्यात आल्या. शिवसेना युवा नेते व राज्याचे आताचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून सीबीएसई, आयसीएसई तसेच आयबी बोर्डाच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे पालिका शाळांमध्ये आपल्या मुलांना एडमिशन मिळावे यासाठी पालक रांगा लावू लागले आहेत. पालिकेने इंग्रजी, सीबीएसई, आयसीएसई, आयबी बोर्डाच्या शाळा सुरू केल्याने विद्यार्थ्यांना चांगले दर्जेदार शिक्षण मिळणे शक्य झाले आहे.