महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

गृहमंत्र्यांनी 100 कोटींचे वसुलीचे टार्गेट दिल्याचा परमबीर सिंग यांचा आरोप; अनिल देशमुखांनी 'ही' दिली प्रतिक्रिया - paramvir singh letter to CM Maharashtra

परमबीर सिंग , गृहमंत्री अनिल देशमुख
संपादित

By

Published : Mar 20, 2021, 6:51 PM IST

Updated : Mar 20, 2021, 10:19 PM IST

18:46 March 20

गृहमंत्र्यांनी दिले होते 100 कोटींचे वसुलीचे टार्गेट; परमबीर सिंग यांचे मुख्यमंत्र्यांना कथित पत्र

गृहमंत्री अनिल देशमुख यांचे ट्विट
मनसुख हिरेन यांचे वकील के. एच. गिरी यांची प्रतिक्रिया

मुंबई-   दर महिन्याला 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून पोलीस अधिकारी सचिन वाझेला देण्यात आल्याचा आरोप माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या कथित पत्रामध्ये केला आहे. हे आरोप गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फेटाळून लावले आहेत. तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा मागितला आहे.  


मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या कथित पत्राबद्दल काही गोष्टींचा खुलासा केलेला आहे. 

काय म्हटले आहे परमबीर सिंग यांनी पत्रात?

 परमबीर सिंग यांनी लिहिलेल्या कथित आरोप केलेला आहे की मुंबई पोलीस खात्यामध्ये पुन्हा सामावून घेण्यात आलेल्या सचिन वाझे या अधिकाऱ्याला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानावर बोलावून घेतले होते. या दरम्यान त्यांनी सचिन वाझे यांना सांगितले होते की मुंबईत 1, 750 बार असून प्रत्येक बारकडून 2 ते 3 लाख रुपयांची वसुली दर महिन्याला केल्यास 40 ते 50 कोटी रुपयांचा टार्गेट हे पूर्ण केले जाऊ शकते. उरलेले 50 कोटींच्या टार्गे साठी इतर माध्यमातून प्रयत्न करावा लागेल, असे सांगून दर महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्यास त्यांना सांगण्यात आल्याचा आरोप परमवीर सिंग यांनी केला आहे. यासंदर्भात परमवीर सिंग यांनी मला येऊन सांगितले असता याबद्दलची माहिती मला मिळाली असल्याचा दावा परमबीर सिंग यांनी कथित पत्रात केला आहे.


सोशल सर्विस ब्रँचच्या अधिकाऱ्यालासुद्धा बोलावले-

याबरोबरच मुंबई पोलिसांच्या सोशल सर्विस ब्रांच एसीपी संजय पाटील यांना सुद्धा बंगल्यावर बोलावून घेण्यात आले होते. त्यांनाही अशाच प्रकारचे 40 ते 50 कोटी रुपयांचे टार्गेट देण्यात आल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे . परमबीर सिंग यांनी  लिहिलेल्या पत्रामध्ये 16 मार्च 2019 च्या दिवशी एसीपी पाटील व परमबीर सिंग यांच्या दरम्यान घडलेल्या मेसेजचा तपशील देत म्हटले आहे, की 16 मार्च रोजी त्यांना गृहमंत्र्यांच्या बंगल्यावर बोलावण्यात आलेले होते. याठिकाणी सचिन वाझे यासुद्धा बोलावण्यात आले होते. मुंबई शहरात असलेल्या हुक्का पार्लर , डान्स बार व बार अँड रेस्टॉरंटच्या संदर्भातील वसुलीच्या संदर्भात या ठिकाणी चर्चा झाल्याचा आरोप त्यांनी कथित पत्रात  केलेला आहे. 


मोहन डेलकरसंदर्भात कायदेशीर सल्ला घेतला नाही-

दादरा नगर हवेलीचे अपक्ष खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईतील ग्रीन सि हॉटेलमध्ये आत्महत्या केल्यानंतर या संदर्भात सुसाईड नोटच्या आधारावर आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा मुंबई पोलिसांकडे नोंद घेण्यात यावा,  म्हणून गृहमंत्री हे आग्रही होते. मात्र, मुंबई पोलीस आयुक्त म्हणून मी माझा अनुभव त्यांना सांगून या संदर्भात आपण कायदेशीर सल्ला घेऊन कारवाई करावी, असे सुचवले होते. प्रथम दर्शनी डेलकर यांनी आत्महत्या केली होती.  यास त्यांनी दादरा -नगर हवेली येथील प्रशासन व काही अधिकार्‍यांची नावे सुसाईड नोटमध्ये लिहिलेली होती. त्यामुळे या प्रकरणाचा तपास हा दादरा-नगर हवेलीच्या पोलिसांकडून करण्यात यावा, असे मी सुचविले होते. मात्र असताना सुद्धा माझे मत गृहीत न धरता गृहमंत्र्यांनी यासंदर्भात एसआयटीची घोषणा केली होती, असे परमवीर सिंग यांनी म्हटले आहे. परमवीर सिंग यांनी म्हटले आहे,  की गेल्या दीड वर्षाच्या माझ्या मुंबई पोलिस आयुक्त पदाच्या कारकिर्दीत गृहमंत्र्यांनी सतत माझ्या कार्यालयात फोन करून वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना आदेश दिले होते. जे कायद्याच्या चौकटीत बसत नसून संविधानाच्या विरोधात असल्याचेही मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग म्हटले आहे.

निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे या अधिकाऱ्याला शासकीय बंगल्यावर बोलावून  100 कोटींचे टार्गेट दिले होते, असे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पत्रात म्हटले आहे.  सोशल सर्विस ब्रँचच्या अधिकाऱ्याला हुक्का, डान्स बार व इतर ठिकाणी धाडी मारून वसुली करण्याचे टार्गेट दिल्याचाही त्यांनी पत्रात आरोप केला आहे. 

गृहमंत्र्यांनी फेटाळले आरोप-

दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माजी पोलीस आयुक्त सिंग यांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. याबाबत त्यांनी ट्विट करून म्हटले की, परमबीर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठी तसेच पुढच्या कायदेशीर कारवाईपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केला आहे. मुकेश अंबानी प्रकरणी तसेच मनसुख हिरेन हत्याप्रकरणी सचिन वाजे यांचा सहभाग स्पष्ट होत असताना व त्याचे धागेदोरे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबिर सिंग यांच्यापर्यंत पोहोचणार असल्याची शक्यता असल्याचे गृहमंत्र्यांनी म्हटले आहे. 

हेही वाचा-अँटिलिया प्रकरणात सचिन वाझेंकडून एनआयएने करून घेतले नाट्य रूपांतर

कोण आहेत परमबीर सिंग  ?

मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून संजय बर्वे निवृत्त झाल्यानंतर मुंबई पोलीस आयुक्तपदी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक परमबीर सिंग यांची फेब्रुवारी २०१९ मध्ये वर्णी लागली होती. जून 2022 पर्यंत यांचा आयुक्त पदावर कार्यकाळ राहणार होता. मात्र, अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके आढळल्यानंतरच्या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना निलंबित करण्यात आले. त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली केली होती.  

परमबीर सिंग हे 1988 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून सिंग यांची ओळख आहे. गेली अनेक वर्षे वेगवेगळ्या सरकारमधील नेत्यांशी चांगले संबंध आहेत. लाललुचत प्रतिबंधक विभागापूर्वी त्यांनी ठाण्याचे आयुक्त म्हणून काम पाहिले होते. त्यांच्याच कार्यकाळात अंडरवर्ल्ड डॉन दाउद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला ठाणे खंडणी विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या होत्या. त्यानंतर त्यांना राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक कायदा व सुव्यस्थेचा या पदी नेमण्यात आले होते. 

हेही वाचा-माझ्या राजीनाम्याच्या बातम्यांमध्ये तथ्य नाही - गृहमंत्री देशमुख

चौकशीमध्ये अक्षम्य चुका-

मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यानंतर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबत खुलासा केला होता. या प्रशासकीय बदल्या नाहीत. ही एक कारवाई आहे. चौकशीमध्ये अक्षम्य चुका समोर आल्या आहेत. त्यामुळे संबंधित प्रकरणाच्या चौकशीत बाधा येऊ नये, निपक्षपाती चौकशी व्हावी, यासाठी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्याची माहिती गृहमंत्री देशमुख यांनी दिली. घटनेतील प्रत्येक दोषींवर कारवाई करणार असल्याचेही ते म्हणाले होते.

मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी-

सचिन वाझे प्रकरणावरून चांगलेच अडचणीत आलेल्या ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला होता. मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आली असून त्यांच्या जागी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांची वर्णी लागली आहे.

रजनीश शेठ यांच्याकडे राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला असून संजय पांडे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जबाबदारी दिली आहे. तर परमबीर सिंह यांच्याकडे गृहरक्षक दलाची जबाबदारी देण्यात आली आहे.

मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया इमारतीच्या बाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीतील स्फोटकांच्या संदर्भात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून सचिन वाझे या अधिकाऱ्याला अटक करण्यात आल्यानंतर हे प्रकरण मुंबई पोलीस आयुक्तांच्या अंगाशी आल्याचे स्पष्ट झालेले आहे. हेमंत नगराळे यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी वर्णी लागली आहे.  

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एनआयएकडे-

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपासही एनआयएकडे सोपविण्यात आला आहे. हा तपास एनआयएकडे सोपविल्याने सचिन वाझेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. अँटिलियासमोर स्कॉर्पिओत स्फोटके आढळून आल्याप्रकरणी एनआयएकडून तपास केला जात आहे.  आता हिरेन प्रकरणाचा तपासही एनआयएकडून केला जाणार आहे. 

हिरेन यांचा मृतदेह सापडलेल्या ठिकाणी आढळला दुसरा मृतदेह

मनसुख हिरेन यांचा मृतदेह ज्या ठिकाणी सापडला होता त्याच ठिकाणी आणखी एका व्यक्तीचा मृतदेह शनिवारी आढळून आला. शेख सलीम अब्दुल असे त्या मृत व्यक्तीचे नाव असून पाण्यात बूडून त्याचा मृत्यू झाला आहे. मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचे गुढ अजून उकललेले नसतानाच पुन्हा त्याच ठिकाणी दुसरा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, मृत व्यक्ती रेतीबंदर येथेच आपल्या पत्नी सोबत वास्तव्यास होता. त्याला फिट येण्याचा जुना आजार होता. सकाळी शौचालयाला गेल्यावर त्याचा पाय घरसला असावा आणि पाण्यात पडल्यावर त्याला फिट येऊन त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

अँटिलियासमोर एनआयएकडून रिक्रिएशन

अँटिलिया प्रकरणी एनआयएने शुक्रवारी रात्री सचिन वाझेंना चालवून सीन रिक्रिएशन केले. सीसीटीव्हीतील इसमाने परिधान केलेल्या कपड्यांसारखेच कपडे घालायला लावून सचिन वाझेंना घटनास्थळावरून चालविण्यात आले. सीसीटीव्हीत दिसणारी पीपीई किटमधील व्यक्ती सचिन वाझेच आहे का? याचा तपास एनआयएकडून केला जात आहे.  

काय आहे प्रकरण?

उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर २५ फेब्रुवारीला स्पोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आढळून आली होती. यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास सुरू केला. या प्रकरणी स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह 5 मार्च रोजी रेतीबंदरमधील खाडीत आढळून आला. यानंतर विरोधकांनी हे प्रकरण उचलून धरत गुन्हे शाखेचे अधिकारी सचिन वाझेंवर कारवाईची मागणी केली. दरम्यान, हिरेन यांच्या पत्नीनेही वाझेंवर आरोप केले. यानंतर अँटिलिया प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपविण्यात आला. तर हिरेन प्रकरणाचा तपास एटीएसकडून केला जात होता. मात्र हा तपासही एनआयएकडे देण्यात आला आहे.

याप्रकरणाचा तपास एटीएस करत होते. मात्र केंद्राच्या एनआयएनेकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी एटीएसमार्फत चौकशी केली जात आहे. तसेच सचिन वाझे यांना क्राईम ब्रँच पदावरून बाजूला केले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असताना कारचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह ठाण्याजवळील मुंब्रा खाडीत सापडला होता. प्रकरणाच्या चौकशीदरम्यान मनसुख हिरेन आणि सचिन वाझे एकमेकांना ओळखत असल्याचे समोर आले आणि हिरेन यांची हत्या वाझेंनी केल्याचा संशय बळावला. वाझेंची चौकशी झाल्यानंतर त्यांना अँटिलिया कार स्फोटक प्रकरणी ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर वाझेंना २५ मार्चपर्यंत एनआयए कोठडी देण्यात आली होती. अँटिलिया स्फोटक प्रकरणी आधीच एनआयए कोठडीत असलेल्या वाझेंच्या अडचणीत आता वाढ झाली आहे. मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास एनआयए करणार असून हिरेन यांची हत्या वाझेंनी केल्याचा संशय आहे

Last Updated : Mar 20, 2021, 10:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details