मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटींच्या वसुलीसंदर्भात आरोप लावून देशाच्या राजकारणात खळबळ उडवून देणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे सध्या मोठ्या सुटीवर गेले असून अजुनही ते कामावर हजर न झाल्याने आता वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. या प्रकरणी ईडीकडून देशमुखांविरोधात फास आवळला जात असतानाच परमबीर सिंग यांची गैरहजेरी चर्चेचा विषय ठरत आहे हे येथे उल्लेखनीय.
5 मे पासून परमबीर सिंग सुटीवर
परमबीर सिंग यांनी मार्च महिन्यात लेटर बॉम्ब टाकला होता. त्यानंतर ते गृहरक्षक दलाचे संचालक म्हणून काही दिवस कामावर हजर झाले आणि ५ मे रोजी सुटीवर गेले. तेव्हापासून ते आजपर्यंत सिंग कामावर हजर झालेले नाही. गृहविभागाकडून दोन वेळा पत्र पाठवून त्यांना विचारणा करण्यात आली. मात्र त्यांच्याकडून कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही. परमबीर सिंग यांच्याविरोधात गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यांच्याशी संपर्क होत नसल्याने लूकआऊट नोटीसही जारी करण्यात आली आहे. दरम्यान, परमबीर सिंग सध्या चंदीगड येथे असल्याचे बोलले जात आहे. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार त्यांच्या चंदीगडमधील घरालाही कुलूप असल्याचे समजते आहे. त्यामुळे परमबीर सिंग गेले कुठे या चर्चांना उधाण आले आहे.