मुंबई -माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी 100 कोटी कथित वसुली प्रकरणाचा आरोप केला होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास करण्यासाठी राज्य सरकारकडून चांदिवाल आयोगाची स्थापना करण्यात आली. आज अनिल देशमुखांच्या वतीने चांदिवाल आयोगासमोर फायनल सबमिशन करण्यात आले असून त्यामध्ये अनेक गौप्यस्फोट करण्यात आले आहेत.
हेही वाचा -Kashmir Files Movie : मुंबई उच्च न्यायालयाने कश्मीर फाइल्स चित्रपटाविरुद्ध दाखल केलेली जनहित याचिका फेटाळली
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना सचिन वाझे यांच्या खंडणीखोरीबाबत सर्व माहिती होती, असा दावा अनिल देशमुख यांनी आज चांदीवाल आयोगासमोर केला. याबाबत सर्व गोष्टी माहीत होत्या तरी देखील परमबीर सिंग यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही. तसेच, सचिन वाझे यांना पुन्हा पोलीस दलामध्ये समावेश करण्यासाठी परमबीर सिंग यांची महत्त्वाची भूमिका असल्याचा दावा देखील अनिल देशमुख यांनी यावेळी केला.
आतापर्यंतच्या चांदिवाल आयोगाच्या चौकशीदरम्यान अनिल देशमुखांच्या बाजूने असणारे सर्व मुद्दे या सबमिशनमध्ये आहेत. या सबमिशनंतर आता शेवटचे युक्तिवाद होतील. देशमुखांनी उलटतपासणीदरम्यान वाझेने दिलेल्या उत्तरांचा उल्लेख आणि त्यांच्या बाजूने असणाऱ्या अनेक गोष्टी या सबमिशनमध्ये नमूद केल्या आहेत. यापैकी महत्वाचे म्हणजे, वाझेला सेवेत घेण्यासाठी परमबीर सिंग यांनी प्रयत्न केले, असे वाझेने उलटतपासणीदरम्यान सांगितले होते, त्याचा उल्लेख त्यांनी केला आहे.
वाझेने असेही सांगितले होते की, त्याने देशमुखांना किंवा कुंदन शिंदे आणि संजीव पलांडे यांना कोणत्याही पद्धतीने पैसे दिले नव्हते. देशमुखांनी या बाबी त्यांच्या सबमिशनमध्ये नमूद केल्या आहेत. या सबमिशनमध्ये डीसीपी राजू भुजबळ, एसीपी संजय पाटील, सचिन वाझे, अनिल देशमुख, संजीव पलांडे यांच्या उलटतपासणीवेळी समोर आलेल्या बाबींचा उल्लेख आहे.
हेही वाचा -BMC : रस्ते पदपथांवर डेब्रिज टाकणाऱ्या संस्थांविरोधात पोलीस तक्रार करा - पालिका आयुक्तांचे निर्देश