मुंबई- राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव हा सर्वाधिक मुंबई शहरात दिसून येत आहे. मात्र, कोरोनाची बाधा झालेल्या मुंबईतील रुग्णांमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण कमी असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे या रुग्णांना ऑक्सिजन कमी पडू नये तसेच त्यांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू होऊ नये, म्हणून उपाययोजना करण्यात येत आहेत. यासाठी घाटकोपर येथे ऑक्सिजन सेंटर उभारण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या महापालिकेतील गटनेत्या राखी जाधव यांनी दिली.
कोरोनाबाधितांसाठी घाटकोपरमध्ये ऑक्सिजन सेंटर सुरू - कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन
या ऑक्सिजन केंद्रात एकूण 42 बेड आहेत. घाटकोपर पंतनगर येथील समाज मंदिर हॉल येथे तळ आणि पहिल्या मजल्यावर हे केंद्र उभारण्यात आले आहे. याठिकाणी रुग्णांना ऑक्सिजन मिळावे म्हणून ऑक्सिजन मशीन बसवण्यात आल्या आहेत. मुंबई महापालिकेने हे ऑक्सिजन केंद्र उभारले असल्याने रुग्णांवर याठिकाणी मोफत उपचार होणार असल्याची माहिती राखी जाधव यांनी दिली.
मुंबईत रोज हजारांहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्या कोरोनाबाधित रुग्णांपैकी जास्तीत जास्त रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता भासत आहे. ऑक्सिजनची व्यवस्था मोठी रुग्णालये तसेच कोरोना सेंटर येथेच असते. या ठिकाणी पोहोचेपर्यंत रुग्णांची प्रकृती आणखी बिघडते. परिणामी ऑक्सिजन न मिळाल्याने रुग्णांचा मृत्यू झाल्याचे अनेक वेळा समोर आले आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोना रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत, ऑक्सिजन अभावी रुग्णाचा मृत्यू होऊ नये, म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पालिकेतील गटनेत्या राखी जाधव यांच्या प्रयत्नाने घाटकोपर पंत नगर येथे ऑक्सिजन सेंटर उभारण्यात आले आहे. या केंद्रात रुग्णाची प्रकृती स्थिर झाल्यावर त्याला रुग्णालयात किंवा केअर सेंटरमध्ये उपचारासाठी पाठवले जाणार आहे, अशी माहिती राखी जाधव यांनी दिली.