मुंबई -मुंबईत फेब्रुवारीच्या मध्यानंतर झपाट्या्ने वाढलेला कोरोना आता उतरणीला लागला आहे. रोज ८ ते ११ हजारावर पोहचलेली रुग्णांची संख्या आता अडीच ते तीन हजारावर घसरली आहे. तर दुसरीकडे रोज बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत असून रोज पाच ते साडेपाच हजारावर रुग्ण बरे होऊन घरी परतत आहेत. मागील महिनाभरात दोन लाखांवर रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कडक लॉकडाऊनमुळे मुंबईतील कोरोनाची स्थिती आता सुधारत असल्याचे दिलासादायक चित्र आहे.
मुंबईत महिनाभरात दोन लाखांवर रुग्णांची कोरोनावर मात - मुंबई कोरोना अपडेट
मुंबईत फेब्रुवारीच्या मध्यानंतर झपाट्या्ने वाढलेला कोरोना आता उतरणीला लागला आहे. रोज ८ ते ११ हजारावर पोहचलेली रुग्णांची संख्या आता अडीच ते तीन हजारावर घसरली आहे. तर दुसरीकडे रोज बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत असून रोज पाच ते साडेपाच हजारावर रुग्ण बरे होऊन घरी परतत आहेत.
२ लाख २३ हजार २३१ रुग्ण बरे -
वाढलेल्या कोरोना रुग्णसंख्येमुळे मुंबईतील आरोग्यसेवेवर ताण वाढल्याने यंत्रणेची धावपळ उडाली होती. बेड्स, ऑक्सिजन, वेंटिलेटरची कमतरता भासू लागल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसमोर अडचणी आल्या. ११ हजारावर गेलेली रुग्णसंख्या आणखी वाढत गेली तर रुग्णसेवा पुरती कोलमडून जाईल, अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र कडक लॉकडाऊन, प्रभावी उपाययोजना, लसीकरण मोहिम तसेच नियमाच्या कडक अंमलबजावणीमुळे रुग्णसंख्या घटू लागली आहे. ११ हजारावर पोहचलेली रुग्णसंख्या सध्या अडीच ते तीन हजारापर्यंत खाली आली आहे. यात रोज आढळणाऱ्या रुग्णसंख्येहून अधिक रुग्ण बरे होऊन घरी परतत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. पालिकेच्या आकडेवानुसार ४ एप्रिल ते ४ मे या कालावधीत तब्बल २ लाख २३ हजार २३१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर मार्च २०२० ते ४ एप्रिल या वर्षभराच्या काळात ५ लाख ९४ हजार ८५९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. रोज पाच ते साडेपाच हजारावर रुग्ण बरे होऊन घरी परतत आहेत. गेल्या महिनाभरात दोन लाखाहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने कोरोनाची दुसरी लाट लवकरच ओसरण्याची समाधानकारक स्थिती आहे.
उपचार पद्धती व मुंबईकरांची साथ -
मार्च २०२० मध्ये मुंबईत कोरोनाचा फैलाव झाला. मार्च ते जून या चार महिन्यांच्या कालावधीत रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत गेली आणि मुंबईत कोरोनाच्या पहिल्या लाटेचा परिणाम दिसू लागला. वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता पालिकेसह खाजगी रुग्णालयात कोविड रुग्णालय, जम्बो कोविड सेंटर उभारण्यात आले. वेळीच उपचार पद्धती व मुंबईकरांची साथ यामुळे कोरोनाची पहिल्या लाटेवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.