मुंबई -राज्यात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात दुचाकींची संख्या वाढली आहे. दुचाकींची संख्या वाढण्यासाेबतच वाहतुकीच्या नियमांच्या उल्लंघनाचे प्रमाणही वाढले आहे. त्यातच काही महिन्यांपूर्वी हेल्मेटसक्तीविरोधात बोलणाऱ्या नेत्यांमुळे वाहनचालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी सर्व प्रश्नचिन्हांना पूर्णविराम देत हेल्मेट सक्ती कायद्यात असून त्याला कोणताही पर्याय नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. हेल्मेटचा वापर वाढावा म्हणून शासकीय कार्यालयांपासून ( Government Offices ) कारवाई सुरू करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत.
कायद्याहून कुणीही मोठे नाही -केंद्र व राज्य शासनाने हेल्मेट सक्तीचा नियम रद्द केलेला नाही. परिणामी, राज्यात कुठेही हेल्मेटशिवाय दुचाकी चालवता येणार नाही. तसा प्रयत्नही चालकांनी करू नयेत. रस्ते अपघातात मृत्यू होणाऱ्यांमध्ये दुचाकीस्वारांचे प्रमाण अधिक आहे. त्यातही हेल्मेटअभावी डोक्याला गंभीर दुखापत होऊन दगावणाऱ्यांची संख्या अधिक आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या रस्ता सुरक्षा समितीनेही याबाबत चिंता व्यक्त केली आहे. रस्ते सुरक्षा समितीच्या माहितीनुसार, दुचाकींचे सर्वाधिक अपघात हे अंतर्गत रस्त्यांवर झाले आहेत. तसेच हेल्मेट परिधान केल्यामुळे अपघाती मृत्यूंचे प्रमाण घटल्याचे वारंवार समोर आले आहे. म्हणूनच राज्यात अंतर्गत रस्त्यांवर हेल्मेट वापरण्याची गरज नाही ? असे कोण्ही बोलू नयेत. देशात हेल्मेट सक्तीचा कायदा आहे. कायद्याहून कुणीही मोठे नाही. त्यामुळे प्रत्येकाने या नियमाचे पालन करणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी दिली आहे.