मुंबई - मागच्या महिन्यात तब्बल २० महिन्यानंतर राज्य सरकारने महिला आयोग अध्यक्षपदी रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांची निवड केली. महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आल्यानंतर महामंडळ वाटपात महिला आयोग (Maharashtra State Women Commission) हे पद राष्ट्रवादीकडे गेले होते. कोरोना काळात हे पद रिकामेच होते. याबाबत विरोधकांनी वारंवार आवाज उठवला. अखेर तब्बल २० महिन्यांच्या कालांतरानंतर हे पद भरले आहे. परंतु, हे पद भरून १ महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटला तरीसुद्धा या आयोगाच्या सदस्यपदी अजून कोणाचीही नियुक्ती झाली नाही. त्यामुळे आयोगाला काही अर्थ राहिला नाही, अशी टीका राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा विजया रहाटकर (Vijaya Rahatkar) यांनी केली आहे.
- आयोगाच्या सदस्यांची नेमणूक कधी?
सध्या राज्यात महिलांवरील अत्याचार, बलात्कार, कौटुंबिक हिंसाचार, महिला लैंगिक अत्याचार या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. एकंदरीत ही सर्व प्रकरण हाताळताना यामध्ये राष्ट्रीय महिला आयोग व त्याचबरोबर राज्य महिला आयोगाचासुद्धा मोठा हातभार लागत असतो. परंतु, राज्यात मागील २० महिन्यापासून राज्य महिला आयोग हे पद रिकामेच होते. शिवसेना-भाजप युतीचे सरकार गेल्यानंतर मागच्या वर्षी या आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी ४ फेब्रुवारी २०२० रोजी या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर तब्बल २० महिन्यानंतर महाविकास आघाडी सरकारने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांची या पदावर नियुक्ती केली. अध्यक्षपद जरी भरले असले तरी या समितीच्या इतर ६ सदस्यांची नियुक्ती अजून झाली नाही. जोपर्यंत सदस्यांची नियुक्ती होऊन कोरम पूर्ण केला जात नाही तोपर्यंत या आयोगाला काहीच महत्त्व नसल्याचे भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.
- आयोग पूर्णपणे अस्तित्वात नसल्याने महिलांचे मोठे नुकसान -