मुंबई-अर्थसंकल्पीय अधिवेशन शिवसेनेसाठी अग्नीपरीक्षा ठरली आहे. विरोधकांचा शिवसेनेवर रोष होता. त्यामुळे प्रत्येक मुद्द्याला थेट विरोधकांकडून मुख्यमंत्री आणि शिवसेनेला टार्गेट करण्यात आले. संजय राठोड प्रकरण, मनसुख हिरेन प्रकरण आणि औरंगाबाद नामांतराचा मुद्दा अशा प्रत्येक मुद्द्यावर विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना घेरण्याचा तसेच शिवसेनेला नामोहरण करण्याचा प्रयत्न केला.
एक मार्च ते दहा मार्च या कालावधीत विधानपरिषद आणि विधानसभेत प्रत्येक मुद्द्यावरून शिवसेनेला लक्ष्य करण्याचा विरोधकांचा प्रयत्न राहिलेला आहे. अधिवेशनात सुरू होण्याच्या आधीच संजय राठोड यांचा राजीनामा घेतला गेला नाही तर, अधिवेशन चालू देणार नाही असा इशारा विरोधकांकडून थेट मुख्यमंत्र्यांना देण्यात आला होता. त्यानंतर अधिवेशन सुरू होण्याआधी मुख्यमंत्र्यांनी माजी वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेत विरोधकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र , तरीदेखील विरोधकांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून मुख्यमंत्री तसेच शिवसेनेला अधिवेशनामध्ये थेट टार्गेट केले.
हेही वाचा-'तुम इतना जो मुस्करा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो' गृहमंत्र्यांचा सुधीर मुनगंटीवारांना चिमटा
संजय राठोड प्रकरण-
माजी मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतल्यानंतर विरोधक शांत बसतील असे सत्ताधाऱ्यांना वाटले होते. मात्र, तरीदेखील संजय राठोड यांच्या राजीनामाच्या मुद्द्यावर विरोधकांनी थेट मुख्यमंत्र्यांना टार्गेट केले. शिवसेनेचे मंत्री कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडत आहेत, असा विरोधकांनी आरोप केला. तसेच मुख्यमंत्र्यांनी आवाहन केल्यानंतरही कोरोनाचे नियमांना बगल देत संजय राठोड यांनी पोहरादेवी येथे गर्दी जमविली. त्यामुळे मुख्यमंत्री नेमकं काय करत आहेत? असा सवाल यावेळी विरोधकांनी अधिवेशनात उपस्थित केला. याच मुद्द्यावर वेळोवेळी विधान भवनाच्या पायर्यांवर मुख्यमंत्र्यांच्या विरोधात विरोधकांनी घोषणाबाजी केल्याचे पाहायला मिळाले. माजी वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा जरी घेतला असला तरी तो घ्यायला मुख्यमंत्र्यांना चौदा दिवसांचा वेळ का लागला, हा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला. यासोबतच राजीनामा घेतल्यानंतर तो राज्यपालांकडे पाठवला तीन दिवस का लागले? मुख्यमंत्री संजय राठोड यांना वाचवण्याचा प्रयत्न करतात का? असा वारंवार सवाल विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत उपस्थित केले होते.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांचा मुख्यमंत्र्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न हेही वाचा-'खलनायकही ताकदीचा लागतो! पुढील साडेतीन वर्ष विरोधकांनी अशीच भूमिका साकारावी'
मनसुख हिरेन हत्याप्रकरण-
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराच्या जवळ स्फोटक असलेली स्कॉर्पिओ कार सापडल्यानंतर अधिवेशनात सुरक्षेचा मुद्दाही चांगलाच तापणार हे जवळजवळ नक्की झाले होते. मात्र, या प्रकरणात स्कॉर्पिओ कारचा मालक मनसुख हिरेन यांची हत्या झाल्यानंतर त्यामागे पोलीस अधिकारी सचिन वझे असल्याचा विरोधकांनी थेट आरोप केला. सचिन वझे यांनी 2008 साली शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे मुख्यमंत्री सचिन वझे यांना वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर केला. सचिन वझे यांचे सी. डी. आर. विधानसभेत दाखवत मनसुख हिरेन यांच्या हत्येमागे त्यांचा हात असल्याचा संशय उपस्थित केला. त्यामुळे सचिन वझे यांना कलम 201 खाली त्यांना अटक करावी अशी मागणी विरोधी पक्षाने केली होती. मात्र, चौकशी आधी कोणाला फाशी देता येणार नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यामुळे या मुद्द्यावरदेखील विरोधक यांनी थेट मुख्यमंत्र्यांना टार्गेट केले.
हेही वाचा-MPSCची परीक्षा पुढे ढकलल्याने काँग्रेस,राष्ट्रवादीची नाराजी
औरंगाबाद शहराच्या नामकरणाचा मुद्दा-
औरंगाबाद शहराचे नाव बदलून संभाजीनगर करण्यात यावे, ही बाळासाहेब ठाकरे यांनी इच्छा व्यक्त केली होती. मा, त्र त्यांचे चिरंजीव राज्याचे मुख्यमंत्री असतानादेखील ती इच्छा पूर्ण होत नाही, असा टोला विरोधकांकडून थेट मुख्यमंत्र्यांना लावण्यात आला. औरंगाबादचे नामकरण करून शहराला संभाजीनगर नाव कधी देणार, असा थेट सवाल विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना विचारला होता.
कोविड साहित्यात भ्रष्टाचार-
गेले वर्षभर राज्यामध्ये कोविडचा प्रादुर्भाव असल्याने त्यासाठी खास तरतुदी आणि निधी राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. . मात्र कोविड संदर्भाच्या उपाय योजना करत असताना राज्य सरकार तसेच महापालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर केला. कोविड सेंटर उभारताना कोणत्याही निविदा मागविण्यात आल्या नाहीत. कोविड सेंट मध्ये लागणारे साहित्य घेताना शिवसेनेच्या नेत्यांनी भ्रष्टाचार केल्याल्याचा आरोप विरोधकांनी केला.
नितेश राणे यांचा आदित्य आणि उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप-
कायदा आणि सुव्यवस्थेवर चर्चा करत असताना भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना टार्गेट केले. अभिनेता असलेला दिनो मोरिया हा सरकारमधील कोणतेही काम करून देत असल्याचे सांगतो. हा कुणाचा मित्र आहे असा सवाल नितेश राणेंनी उपस्थित केला. तसेच नाईटलाईफ गॅंग तयार होत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. जम्बो कोविड सेंटर ज्यांनी बांधले ते नेमके कुणाच्या आशीर्वादाने? एवढेच नाही तर रिझवी कॉलेजच्या बाजूला एका बंगला आहे. तिथे अधिकारी आणि मंत्री का जातात असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे. या सरकारला 5 आणि 8 हे दोन आकडे माहीत आहेत. त्यापुढे जात नाही. पाच आकडा याचा अर्थ पाच महिने की पाच टक्के याचे उत्तर द्यायला हवे असेदेखील नितेश राणे म्हणाले होते.
भास्कर जाधव यांनी लढवली खिंड-
विरोधी पक्षाकडून सातत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेला टार्गेट केले जात होते. संजय राठोड प्रकरण असेल किंवा मग मनसुख हिरेन हत्या प्रकरणात मुख्यमंत्री आणि शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न विरोधकांचा सातत्याने सुरू होता. यावेळी शिवसेनेचे आमदार किंवा मंत्री हे गप्प बसलेले पाहायला मिळाले. त्यातच शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी विरोधकांच्या प्रश्नांना सडेतोड उत्तर देत सत्ताधारी पक्षाकडून एकट्याने खिंड लढविली. सचिन वझे प्रकरणांमध्ये मुख्यमंत्र्यांचा थेट नाव विरोधकांकडून घेतले जात असल्याचे पाहिल्यानंतर भास्कर जाधव यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनाच टार्गेट केले. अन्वय नाईक प्रकरणात चौकशी अधिकारी सचिन वझे असल्यामुळे त्यांना विरोधी पक्षाला टार्गेट करत असल्याचा जाधव यांनी आरोप करून सभागृहात गोंधळ घातला. मनसुख हिरेन आत्महत्या प्रकरणात तपास व्हायला पाहिजे, अशी मागणी विरोधक करत आहेत. मात्र, तिथेच भाजपचे खासदार मोहन डेलकर यांच्याही आत्महत्येच्या तपास व्हायला पाहिजे. मोहन डेलकर यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये भाजपचे दादरा नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल खेडा पटेल तसेच काही अधिकाऱ्यांची नाव आहेत. मुद्दादेखील भास्कर जाधव यांच्याकडून मुद्दा उपस्थित करण्यात आला.
शिवसेनेला घरचा आहेर-
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते आणि रामदास कदम यांनी विधान परिषदेत शिवसेनेला घरचा आहेर दिला. दिवाकर रावते यांनी मराठीच्या मुद्द्यावर महाविकास आघाडी तसेच मुख्यमंत्री यांना धारेवर धरले होते. सभागृहात कामकाजात इंग्रजी शब्दांच्या केल्या जाणाऱ्या वापराला दिवाकर रावते यांच्याकडून जोरदार विरोध झाला. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांना अनेक कानपिचक्या दिल्या. मराठी भाषा आणि मराठी विद्यापीठ मुद्द्यावर रावतेंनी सरकारला धारेवर धरत स्वपक्ष शिवसेनेलाही घरचा आहेर दिला. तसेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हे होत असल्याचे नमूद करत ते विधान परिषदेत चांगलेच भडकले. तसेच मराठीच्या मुद्द्यावर बाळासाहेबांना काय उत्तर देऊ, असा थेट सवाल त्यांनी विधान परिषदेत उपस्थित केला. तर रामदास कदम यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करून नाराजी समोर आणली होती.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांची शिवसेनेवर नाराजी-
अधिवेशन सुरू होण्याआधी संजय राठोड यांच्या राजीनामा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे थेट नाराजी जाहीर केली होती. संजय राठोड यांचा राजीनामा घेऊन हे प्रकरण शांत केले पाहिजे, अशा प्रकारचा सल्ला दोन्ही पक्षाकडून मुख्यमंत्र्यांना देण्यात आला होता. तर सचिन वझे यांच्या अटकेसाठी विरोधक सदनात आकांडतांडव करत असताना त्यांना या प्रकरणापासून वेगळं केले पाहिजे, असादेखील मतप्रवाह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यामध्ये असल्याचा दिसला. याच प्रकरणावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील महाविकास आघाडीचे म्हणजेच तीन पक्षाचे सरकार असल्याकारणाने निर्णय घेण्यात घेता अडचण येत असल्याचे सांगितले. मात्र, आपण नेहमीच एक घाव दोन तुकडे अशा पद्धतीने निर्णय घेतो, असे सुचवत मुख्यमंत्र्यांनी नाराजीचे संकेत दिले होते.
विरोधी पक्षनेते जल्लाद आहेत का?
परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले की, अर्थसंकल्पावर विरोधी पक्षांनी लक्ष केंद्रित केले नाही. त्यांनी सचिन वाझेंवर लक्ष केंद्रित केले. सचिन वाझेंनी अर्णब गोस्वामी यांना अटक केल्याने विरोधी पक्षाने त्यांच्यावर राग काढला. सचिन वाझे यांना फाशी द्या, अशी मागणी करणारे विरोधी पक्षनेते जल्लाद आहेत का? त्यांना जल्लादाच्या भूमिकेतून पाहताना फार वाईट वाटल्याचेही परिवहन मंत्री परब यांनी म्हटले आहे.
विरोधी पक्षनेते जल्लाद आहेत का ? या सर्व मुद्द्यांवर जर नजर टाकली तर लक्षात येते, की विरोधकांनी शिवसेना तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. कोविड काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोशल मीडियाच्या माध्यमातून सामान्य जनतेशी थेट संवाद साधत होते. वेगवेगळ्या निर्णयाच्या माध्यमातून जनसामान्यांच्या मनात चांगली प्रतिमा निर्माण केली होती. मात्र, यावेळी अधिवेशन काळात वेगवेगळ्या मुद्द्यांवरून विरोधकांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला टार्गेट केल्याचे दिसून आले.