महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

धुळे-सोलापूर रस्ता चौपदरीकरणाच्या भूसंपादनात 3 हजार कोटींचा घोटाळा - विजय वडेट्टीवार

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सोलापूर-धुळे रस्त्यांच्या भूसंपादनात घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे.

विजय वडेट्टीवार

By

Published : Sep 20, 2019, 9:32 PM IST

मुंबई - समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनात झालेल्या भ्रष्टाचाराची पुनरावृत्ती आणखी एका महामार्गाच्या भूसंपादनात झालेली आहे. समृद्धी प्रमाणेच धुळे-सोलापूर या 3 हजार कोटी रुपयांच्या रस्ता चौपदरीकरणाच्या भूसंपादनातही असाच घोटाळा करून अधिकारी व दलालांनी संगनमत करून करोडो रुपयांची लूट केली असल्याचा गौप्यस्फोट, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनासाठी सुमारे 6 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आलेला आहे. मात्र, या प्रकल्पाची रुपरेखा आखली जात असतानाच काही सरकारी अधिकाऱ्यांनी या भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने घेऊन नंतर शासनास प्रचंड मोठ्या किंमतीला विकून अधिकारी व दलालांनी उखळ पांढरे करुन घेतले. त्याच पद्धतीने धुळे-सोलापूर महामार्गाच्या चौपदरीकरणात घोटाळा करण्यात आला आहे. या जमिनी काही राजकीय नेते, सरकारी अधिकारी यांच्या असून त्यांनी करोडो रुपयांची लूट केली असल्याचेही वडेट्टीवार म्हणाले.

हेही वाचा -अधिकाऱ्यांच्या संगनमताने आदिवासी विभागात शेकडो कोटींचा फर्निचर घोटाळा - विजय वडेट्टीवार

धुळे-सोलापूर रस्ता चौपदीकरणाच्या जमीन अधिग्रहण प्रक्रियेत बीड जिल्ह्यातील हिरापूर ते रांजणी दरम्यान (ता. गेवराई) पाडळशिंगी गाव व परिसर येथे 2017 मध्ये सुमारे 7 किमीच्या रस्त्यासाठी भूसंपादन करण्यात आले. पाडळशिंगी (गेवराई) येथील 140/600 कि.मी. ते २१९/१०० कि.मी रस्त्यासाठी ज्यांची जमीन घेण्यात आली, त्यातील अशोक रावसाहेब गव्हाणे यांच्या नावे प्रत्यक्षात 7/12 नुसार 0.01 हेक्टर इतके क्षेत्र आणि 1 घर असताना 0.02 हेक्टर क्षेत्र व 13 घरे असल्याचे दाखवून 106.84 लाख रुपये लाटले. गट क्रमांक 425 मधील 0.06 हेक्टर ही शासकीय जमीन संपादित केलेली असताना त्यापोटी असलेला 49.25 लाख रुपयांचा मोबदला मगन नामदेव चव्हाण या खासगी व्यक्तीच्या नावे अदा करण्यात आला आहे. संदीप बळीराम ननवरे यांच्या जमिनीवर प्रत्यक्षात घर नसतांनाही घर दाखवून 27.29 लाख रुपयांचा मोबदला मंजूर करुन घेतला आहे. संगीता बाबुराव ननवरे व संदीप बळीराम ननवरे यांच्या नावे असलेल्या जमिनीचे मुल्याकंन पंचनाम्यात गोठा शेड दर्शविण्यात आले. मात्र, मोबदला मंजूर करताना घरासह गोठे दर्शवून 38.19 लाख रुपयांचा वाढीव मोबदला मंजूर करण्यात आला. गट क्रमांक 368 मध्ये जिनींग मिलच्या जागेत बोगस बांधकामे दाखवून दाल मिल असल्याचे दर्शवून 76 लाख रुपयांचा वाढीव मोबदला लाटला. याच पद्धतीने अनेक ठिकाणी भूसंपादन करताना घोटाळा करण्यात आल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे.

भूसंपादन करताना कागदोपत्री जास्त क्षेत्रफळ दाखवून ज्या गोष्टी प्रत्यक्षात अस्तित्वात नव्हत्या अशा विहिरी, घरे, बांधकामे, झाडे आणि हॉटेल्स दाखवून अधिकारी व दलाल यांनी संगनमत करुन करोडो रुपयांची लूट केलेली आहे. या भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करावी म्हणून शासनाला पत्र पाठवून एक महिना झाला तरी अद्याप त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. सरकार चौकशीस टाळाटाळ करुन कोणाला वाचवित आहे?या भ्रष्टाचाराचा सुत्रधार मंत्रालयात तर नाही ना? का बनवाबनवी करुन शासनाला लुटणारे बोगस लाभार्थी सत्ताधारी पक्षाचे आहेत?असे प्रश्नही वडेट्टीवार यांनी विचारले आहेत.

हेही वाचा -जनसेवा पतसंस्थेत करोडोंचा घोटाळा; व्यवस्थापक नरेंद्र भुसाणेंना ठेवीदारांचा चोप

मागील 5 वर्षात युती शासनाने रस्ते भूसंपादनासाठी जेवढी तत्परता दाखवली तेवढी इतर कामासाठी दाखवलेली दिसत नाही. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन, मुंबई-दिल्ली रेल्वे कॉरिडोर, समृद्धी महामार्ग तसेच राज्यातील अनेक राज्य मार्गांच्या चौपदरीकरणासाठी हजारो हेक्टर जमीन संपादित करण्यात आली. या भूसंपादनाला अनेक भागात विरोध झाला, तसेच मूळ जमीन मालकाला लाभ मिळण्याऐवजी त्यांची फसवणूक करुन दलालांच्या मार्फत इतरांनी आपले खिसे भरले, या सर्वांची चौकशी करण्याची आवश्यकता असताना सरकारने त्याकडे कानाडोळा करुन भ्रष्टाचाऱ्यांना अभयच दिले आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details