मुंबई - केंद्र सरकारने महाराष्ट्राला रेमडेसिवीर इंजेक्शन्स आणि ऑक्सिजनचा पुरवठा करताना इतर राज्यांच्या तुलनेत अधिक जास्तीची मदत केली आहे. त्यामुळे महाविकासआघाडीमधील बोलघेवड्या नेत्यांनी रोज उठून कांगावा करु नये, अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
सध्या लोक दु:खात आहेत. त्यामुळे त्यांना अशाप्रकारचे राजकारण पसंत पडणार नाही. केंद्र आणि राज्य सरकार आपापल्यापरीने महाराष्ट्राला मदत करत आहेत. त्यामुळे मदत मिळत नसल्याचा कांगावा बंद करावा, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
केंद्र सरकारचे आभार मानले नाहीत
सोमवारी अंधेरी येथील एका कोविड सेंटरच्या उदघाटनानिमित्त ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी महाविकासआघाडीच्या नेत्यांवर चांगलेच तोंडसुख घेतले. केंद्र सरकारने सोळा लाखांपैकी चार लाख 35 हजार रेमडेसिवीर इंजेक्शनचा कोटा महाराष्ट्राला दिला आहे. तसेच 1100 व्हेंटिलेटर्सही दिले आहेत. मात्र, या मदतीनंतर मुख्यमंत्री वगळता एकाही महाविकासआघाडीच्या नेत्याने केंद्र सरकारचे आभार मानले नाहीत, अशी खंत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.