मुंबई -राज्यातील जिल्हा परिषदांच्या निकालानंतर भाजपची काही जिल्हा परिषदांमधून सत्ता गेली. तरिही देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत बोलताना, जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष भाजप ठरला असल्याचे म्हटले आहे. तसेच फडणवीस यांनी महाविकास आघाडीवरही टीका केली. या सरकारचं वागणं म्हणजे दुसऱ्याच्या घरी मुलगा झाला म्हणून ह्यांचेच पेढे वाटणे सुरू असल्याची टीका फडणवीस यांनी केली.
हेही वाचा... 'केंद्रातील भाजप सरकारची स्थिती कंगाल आणि दारूड्यासारखी'
राज्यात भाजपच सर्वात मोठा पक्ष...
जिल्हा परिषदांचे निकाल जाहिर झाले. यात भाजपचा पराभव झाल्याचा प्रचार सर्व पक्ष करत आहेत. मात्र, 2012 साली या सर्व जिल्हा परिषदांमध्ये आमच्या एकूण 52 जागा होत्या. आता त्या 106 झाल्या आहेत. याचाच अर्थ भाजपच्या जागा वाढल्या आहेत. तसेच एकूण निकाल राज्यात जिल्हा परिषदांमध्ये सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष देखील भाजप ठरला आहे. याचाच अर्थ जनतेचा विश्वास आणि आशीर्वाद आमच्या सोबत असल्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
नागपूरमध्ये फक्त पिछेहाट झाली आहे....
भारतीय जनता पक्षाचे होम ग्राउंड असलेल्या नागपूर जिल्हा परिषदेतून भाजपची सत्ता गेली आहे. फडणवीस यांनी मात्र, हा दारूण पराभव नाही, तर फक्त पिछेहाट असल्याचे म्हटले आहे. गेल्यावेळी नागपूर परिषदेत भाजपला 21 जागा होत्या आणि शिवसेनेला 8 जागा होत्या. आता आम्हाला 15 जागा आहेत आणि शिवसेनेला 6 जागा. याचा अर्थ आमची फक्त पिछेहाट झाली असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.