मुंबई :भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना सोबत आल्यास सरकार बनवण्यासाठी भाजपचा कोणताही विरोध नसल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना-भाजप युतीच्या चर्चेने जोर धरला होता. मात्र सध्या तरी याबाबत शिवसेनेकडे कोणताही प्रस्ताव नाही, किंवा शिवसेनेकडूनही याबाबतची कोणतीही चर्चा नसल्याचे सांगून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पाटील यांच्या वक्तव्याची हवा काढली आहे.
एका खाजगी वृत्त वहिनी सोबत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेची इच्छा असेल, तर भाजपचा कोणताही विरोध असण्याचे कारण नाही. मात्र यापुढे कोणत्याही निवडणूक या स्वतंत्रपणेच लढवण्याचा भाजपचा निश्चय असल्याचे पाटील यांनी म्हटले होते. नुकत्याच नेमणूक करण्यात आलेल्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीत पुढच्या रणनीतीबाबत विचार विनिमय करण्यात आला आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केलेल्या मार्गदर्शनात यापुढे भाजप स्वतंत्रपणे आपली ताकद आजमावणार आहे. मात्र, काही राजकीय गणिते जरी जुळली, तरी निवडणुका या स्वतंत्रपणे लढण्यावरच पक्षाचा भर आल्याचे पाटील यांनी सांगितले होते.