मुंबई - विरोधी पक्षनेत्याची रविवारी निवड होणार, असे सांगितले जात होते. पण विरोधी पक्ष नेता निवडीचा उल्लेख कार्यक्रम पत्रिकेत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेत्याची निवड लांबणीवर टाकून महाविकास आघाडी ही भाजपला शह देणार असल्याचे चित्र आहे.
विधिमंडळाचा पहिला दिवस महाविकास आघाडीच्या बहुमतासाठीच्या शिरगणतीने गाजला. विरोधी पक्ष असलेल्या भाजपने केलेल्या सभात्यागाची चर्चा झाली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन तांत्रिक बाबी सांगत भाजप आमदारांसोबत सभात्याग केला.
हेही वाचा-ठाकरे सरकारने १६९ आमदारांच्या पाठिंब्याने विश्वासदर्शक ठराव जिंकला
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खरे आव्हान असणार आहे. देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड होण्याची शक्यता आहे. त्यांना विरोधी पक्षनेते पदाचा दांडगा अनुभव आहे. भाजप विरोधी पक्षात असताना त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला अनेक प्रश्नांवरुन धारेवर धरले होते. त्यामुळे महाविकास आघाडीला त्यांच्या विरोधाची धार कमी करण्यासाठी काळजी घ्यावी लागणार आहे.
हेही वाचा-भाजपला पाठिंबा दिलेल्या अपक्ष आमदारांचे महाआघाडीच्या बाजूने मतदान, म्हणाले...
महाविकासआघाडी सरकारने बोलाविलेल्या दोन दिवसीय विशेष अधिवेशनाचा रविवारी शेवटचा दिवस आहे. कार्यक्रम पत्रिकेप्रमाणे रविवारी विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. सध्या, राष्ट्रवादीचे आमदार दिलीप वळसे पाटील यांची हंगामी विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. पण कार्यक्रम पत्रिकेत विरोधी पक्ष नेता निवडीचा उल्लेख नाही. विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत राज्यपालांचे अभिभाषण सायंकाळी 4 वाजता होणार आहे.