मुंबई -बंडखोर नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने विधानसभेत बहुमत चाचणी पार केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला विरोधात बसावे लागणार आहे. तर, विरोधी पक्ष नेते म्हणून आज ( 4 जुलै ) माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार ( Opposition Leader Ajit Pawar ) यांची एकमताने निवड झाली आहे. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितले आम्ही मागच्या सरकारने घेतलेले निर्णय सरसकट रद्द करणार नाही. परंतु, रविवारी ( 3 जुलै ) जीआर काढून डीपीडीसीने मंजूर केलेली काम रद्द केली आहेत. याला काय म्हणायचे, असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला ( Ajit Pawar Taunt Shinde Bjp Government ) आहे.
"विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी माझ्यावर?" - याप्रसंगी बोलताना अजित पवार म्हणाले, दोन दिवसीय अधिवेशन विधानसभेचे घेण्यात आले होते. ते आज संपले आहे. अध्यक्षांची निवड व विश्वास दर्शक ठराव या दोन्ही गोष्टी पार पडल्या आहेत. परंतु, न्यायालयात ज्या गोष्टी प्रलंबित आहेत याचा निर्णय होईलच आणि आम्ही त्याची प्रतीक्षा करत आहोत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विश्वास दर्शक ठरावादरम्यान बरेचसे उमेदवार उपस्थित होते. विरोधी पक्ष नेत्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडे संख्याबळ जास्त असल्यामुळे विरोधी पक्षनेते आमच्याकडेच येणार होते. माझी त्यासाठी निवड करण्यात आली आहे.
"जनतेच्या भल्यासाठी नेहमीच सहकार्य" -आताची माझी जबाबदारी वेगळी आहे. कारण लोकशाहीमध्ये मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री याप्रमाणे विरोधी पक्ष नेत्यांची जबाबदारी तितकीच महत्त्वाची असते. मी गेल्या 32 वर्षांपासून राजकीय क्षेत्रात काम करत आहे. परंतु, आत्ताची गोष्ट लक्षात घेता ही जबाबदारी फार मोठी आहे. त्यातच आपल्या महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष नेत्यांची जबाबदारी खूप मोठी आहे. यापूर्वी अनेक मान्यवरांनी हे पद भूषविले आहे. सदरची जबाबदारी योग्य व यशस्वीपणे पार पाडण्याचा माझा नेहमीच प्रयत्न राहील, हा मला विश्वास आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या तमाम जनतेला द्यायचा आहे. जनतेच्या भल्यासाठी जे काही निर्णय असतील त्यात नेहमीच आमचे सहकार्य राहील, असेही पवार यांनी म्हटलं आहे.