मुंबई -महाराष्ट्र सध्या कोरोना महामारीच्या मोठ्या संकटात आहे. राज्यातील परिस्थिती चिंताजनक आहे. राज्य सरकार सर्व पातळ्यांवर मोठ्या ताकदीने काम करत असताना राज्यातील विरोधी पक्ष मात्र बेजबाबदारपणे वागत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला लक्ष्य करताना पाश्चिमात्य देशांनी दिलेल्या पॅकेजची आकडेवारी देत राज्य सरकारच्या मदतीबद्दल प्रश्न उपस्थित केला आहे. परंतु केंद्रातील मोदी सरकारने महाराष्ट्राला या कठीण परिस्थितीत किती मदत केली, हे फडणवीस यांनी सांगायला हवे होते, अशी विचारणा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
मोदी सरकारने महाराष्ट्राबाबत नेहमीच दुजाभाव केला -
गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्र विविध संकटाचा सामना करत आहे. कोरोना महामारी, चक्रिवादळ, अतिवृष्टी, विदर्भातील पूरस्थिती अशी संकटाची मालिकाच सुरू आहे. अशा परिस्थितीतही मविआ सरकार जनतेला दिलासा देण्यासाठी नेहमी तत्पर राहिले आहे. कोरोनामुळे माझ्यासमोर आर्थिक संकट असतानाही जनतेच्या हितासाठी सरकारने कधीही हात आखडता घेतला नाही. परंतु दुर्दैवाने केंद्रातील मोदी सरकारने नेहमीच महाराष्ट्राला दुजाभावाची वागणूक दिली. राज्याच्या हक्काचा जीएसटी परतावा तसेच इतर निधीही देण्यास टाळाटाळ केली. राज्य संकटात असताना राज्यातील भाजपचे नेते मात्र मविआ सरकारविरोधात कटकारस्थाने करत राहिले. कधी राजभवनच्या माध्यमातून, कधी काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून षडयंत्र रचण्यातच ते मग्न राहिले. केंद्रीय तपास यंत्रणांच्या आडून भाजपाच्या नेत्यांनी महाराष्ट्रातील वातावरण गढूळ करून देशात बदनामी केली. राज्याला आर्थिक मदतीची गरज असताना मुख्यमंत्री मदतनिधीत पैसे जमा न करता राज्यातील भाजपा नेत्यांनी पंतप्रधान केअर फंडात पैसे जमा केले.