लेटर बॉम्ब प्रकरणात आज दिवसभरात कोणत्या घडामोडी घडल्या, वाचा एका क्लिकवर...
Live Updates: लेटर बॉम्बने राज्यातील राजकारण तापलं, मनसुख हिरेण हत्या प्रकरणी गुजरातमधून एकाला अटक - महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू
22:31 March 22
20:22 March 22
वाझेंच्या गाड्यांची आज पुन्हा तपासणी..
अँटिलिया कार स्फोटके प्रकरणात सचिन वाझे अटकेत आहेत. या प्रकरणात एनआयएकडून तपास करण्यात येत आहे. या गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या गाड्यांची आज पुन्हा तपासणी करण्यात आली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुन्ह्यात वापरण्यात आलेली गाडी किती किलोमीटर आणि कोणकोणत्या लोकेशनवर गेली आहे याचा तपास करण्यात आला.
19:48 March 22
एनआयएच्या टीमने हॉटेल ट्रायडंटमधून गोळा केले पूरावे
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर संशयित कार सापडली होती. त्या कारचा मालक मनसुख हिरेनचा संशयास्पद मृत्यू झाल्याने सगळीकडे खळबळ उडाली. याप्रकरणी एनआयएची टीम सबळ पुरावे गोळा करण्यासाठी अनेक ठिकाणी छापे टाकत आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सचिन वाजे हे हॉटेल ट्रायडंटमध्ये थांबत होते. याच हॉटेलमध्ये अनेक बैठका या घेतल्या होत्या. त्यामुळे या ठिकाणी असणारे सीसीटीव्ही फुटेज हे या प्रकरणात महत्त्वाचे पुरावे ठरू शकतात. म्हणून एनआयएच्या टीमने हॉटेलमधून महत्वाची माहिती गोळा केल्याचं समजतंय.
19:29 March 22
परमबीर सिंह प्रकरणी बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची बैठक झाली. या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांसोबत परमबीर सिंग प्रकरणाबाबत चर्चा झाली. एखाद्या अधिकाऱ्याने पत्र लिहिले म्हणून मंत्र्यांचा राजीनामा घेतला जात नाही. तसेच या मुद्द्यावर तिन्ही पक्षाचे नेते बैठक घेतील. विरोधकांचे सर्व प्रयत्न सत्ता मिळवण्यासाठी सुरू असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
18:53 March 22
मनसुख हिरेण हत्या प्रकरणी गुजरातमधून एकाला अटक
मनसुख हिरेण हत्या प्रकरणी एटीएसने आणखी एकाला गुजरातमधून ताब्यात घेतले आहे. एकूण 14 सिम जप्त केले आहेत. हत्येकरीता 14 सिमकार्ड पुरवल्याची माहिती आहे.
18:52 March 22
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा - रामदास आठवले
केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष (आठवले) रामदास आठवले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहले आहे. पत्राद्वारे त्यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली.
18:52 March 22
महाराष्ट्रात लसीकरण वेगाने सुरू - राजेश टोपे
महाराष्ट्रामध्ये कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण वेगाने सुरू आहे. आतापर्यंत 45 लाख लोकांचा लस टोचवण्यात आली आहे. तर दिवसाला 3 लाख लोकांना लस देण्यात येत आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
17:06 March 22
एटीएसकडून 8 सीमकार्ड जप्त. एटीएसची टीम गुजरातमध्ये दाखल.
17:05 March 22
एटीएसच्या दोन टीम माजिवडा येथील एका ऑफिसमध्ये दाखल.
17:03 March 22
सचिन वाझेंच्या ठाण्यातील काही व्यावसायिक ऑफिस आणि गाळ्यांवर एटीएसकडून तपास करण्यात येत असल्याची माहिती.
16:54 March 22
देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि वर्तमान विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील निवासस्थानी अचानक सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. विविध मुद्यांवरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मोठं आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाल्यानंतर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
16:53 March 22
गृहमंत्र्यांना 100 कोटी,मग वर्षा बंगल्यावर किती? किरीट सोमय्यांचा सवाल
सचिन वाझे जर गृहमंत्र्यांना 100 कोटी देतो. तर मग वर्षा बंगल्यावर किती देण्यात आले, असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला. नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. एकीकडे मुख्यमंत्री म्हणतात परमबीर सिंग चांगले अधिकारी आहेत. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री म्हणतात परमबीर लबाड माणूस आहे. शरद पवार हे गृहमंत्री अनिल देशमुख यांची पाठराखण करत असून पवार यांनी देशाची चेष्टा करणं थांबवावे, असे सोमय्या म्हणाले
16:03 March 22
अनिल देशमुखांची शरद पवारांना धमकी?
रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी अनिल देशमुखांचा राजीनामा घेणं हा मुख्यमंत्र्यांचा विषय आहे, असे म्हटलं होते. मात्र, लगेच त्यांनी भूमिका बदलली. राजीनाम्याची आवश्यकता नाही, असे पवार आज म्हणाले. अनिल देशमुखांनी त्यांना धमकी तर दिली नाही ना? अशी शंका भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.
16:00 March 22
15 तारखेच्या पत्रकार परिषदेवर गृहमंत्री अनिल देशमुख यांचे स्पष्टीकरण
गृहमंत्री अनिल देशमुख हे 5 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारीपर्यंत नागपूरातील खाजगी रुग्णालय अलेक्सिसमध्ये उपचार घेत होते. त्यानंतर ते 14 दिवस विलगीकरणात होते. यादरम्यान ते कोणालाच भेटले नाहीत, असे राष्ट्रवादीच प्रमुख शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं. मात्र, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी हा मुद्दा खोडून काढला. 15 फेब्रुवारीला अनिल देशमूख यांनी पत्रकार परिषद घेतल्याचे फडणवीस यांनी म्हटलं. यावर अनिल देशमूख यांनी स्पष्टीकरण दिले. 15 फेब्रुवारीला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर आपण जेव्हा बाहेर आलो, तेव्हा माध्यम प्रतिनिधी तेथेच उपस्थित होते. त्यामुळे त्यावेळी त्यांच्याशी संवाद साधला असे देशमुखांनी म्हटले आहे. यानंतर मी 15 ते 28 फेब्रुवारीपर्यंत होम क्वारंटाईन होतो. 28 फेब्रुवारीला मी पहिल्यांदा घराबाहेर पडून मुंबईमधील सह्याद्री गेस्ट हाऊसला गेलो, असे त्यांनी स्पष्ट केले.
14:53 March 22
भातखळकरांची पोलीस ठाण्यात तक्रार
भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी अनिल देशमुख यांच्याविरोधात कांदिवलीच्या समता नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. खंडणीप्रकरणी देशमुखांची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी भातखळकर यांनी या तक्रारीत केली आहे.
14:52 March 22
प्रकाश आंबेडकर यांनी राज्यापालांची भेट घेतली
वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेतली. सरकार बरखास्तीची मागणी त्यांनी केली.
14:52 March 22
भाजपाचे राज्यभर आंदोलन
भारतीय जनता युवा मोर्चाकडून आज राज्यभर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करण्यात आली. नागपूरमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. मुंबईत विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. आंदोलनामध्ये गृहमंत्र्यांनी आपला तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे.
14:52 March 22
परमबीर सिंग यांचा गृहमंत्र्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न - नवाब मलिक
गृहमंत्री अनिल देशमुख कोरोना पॉझिटिव्ह असताना त्यांना भेटल्याचे वक्तव्य माजी आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे. परमबीर सिंग यांनी कटकारस्थान करुन महाविकास आघाडीला आणि गृहमंत्र्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. त्याची चौकशी होईलच व त्यादृष्टीने कारवाई होणार मात्र, गृहमंत्री अनिल देशमुख यांचा तूर्तास राजीनामा घेतला जाणार नसल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली. मुंबईचे माजी आयुक्त परमबीर सिंग यांच्या चिठ्ठीनंतर उपस्थित वादावर नवाब मलिक यांनी गृहमंत्र्यांची पाठराखण केली आहे.
14:23 March 22
लोकसभेत बोलू दिले नाही - विनायक राऊत
लोकसभेतमध्ये भाजपा आमदारांनी गदारोळ घातला. आम्हाला बोलू दिले नाही, असे शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी म्हटलं. परमबीर सिंग हे भष्ट्र आहेत. परमबीर सिंग यांनी अनुप डांगेंना त्रास दिला. ते केंद्राचे बोलका पोपट आहेत, असे शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी म्हटलं.
14:11 March 22
परमबीर सिंग यांची सर्वोच्च न्यायालयात याचिका
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहलेल्या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आज पुन्हा परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात आपण जे आरोप केले आहेत. त्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी याचिकेद्वारे केली आहे. या याचिकेत आपण केल्या सर्व आरोपांची चौकशी करावी. त्यासाठी सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात यावेत अशी मागणी केली आहे.
13:45 March 22
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे टि्वट
परमबीर सिंग यांनी उल्लेख केलेल्या तारखेला गृहमंत्री अनिल देशमूख रुग्णालयात होते, असे शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टि्वट केले आहे. 15 ते 27 फेब्रुवारी या कालावधीत अनिल देशमुख होम क्वारंटाईन होते, असे पवार साहेब सांगतात. पण, 15 ला सुरक्षारक्षकांसह, पत्रपरिषद मात्र झाली होती, असे फडणीवस यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे. तसेच त्यांनी पत्रकार परिषदेचा व्हिडिओ टि्वट केला.
13:14 March 22
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांची काँग्रेस नेत्यांशी चर्चा
वाझे प्रकरणी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांची नाना पटोले, अशोक चव्हाण व बाळासाहेब थोरात यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा.
13:10 March 22
राजीनाम्याचा प्रश्नच नाही - शरद पवार
तपासापासून लक्ष विचलीत करण्यासाठीच आरोप करण्यात आले आहेत. देशमुख हे तेव्हा रूग्णालयात होते. तशी कागदपत्र ही आहेत. सरकारवर कोणताही असर होणार नाही. मंत्र्यांवर जे आरोप आहेत त्या काळात ते कुठे होते, हे स्पष्ट झाले आहे.अशा वेळी त्यांचा राजीनामा घेणे योग्य नाही. त्यामुळे राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही, असे शऱद पवार यांनी सांगितले.
13:10 March 22
मुंबई एटीएस योग्य तपास करत आहे - शरद पवार
मुख्य केस ही अंबानींच्या घराबाहेर ठेवलेली स्फोटकाची गाडी आहे. गाडी कोणी ठेवली आणि का ठेवली हे महत्वाचे आहे. मुंबई एटीएस बरोबर तपास करत आहे. ते योग्य दिशेने जात आहेत. मात्र, काही जण लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न करत आहेत.
13:10 March 22
अनिल देशमुख नागपूरात होते - शरद पवार
माजी पोलीस आयुक्तांनी उल्लेख केलेल्या तारखेप्रमाणे पाहिले असता, त्यावेळी अनिल देशमुख नागपूरात होते. हिरेनची हत्या कोणी केली हे आता स्पष्ट झाले आहे. एटीएसने त्याचा छडा लावला आहे.
13:07 March 22
शरद पवार यांची पत्रकार परिषद
परमबीरसिंग यांच्या पत्रामुळे महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याच्या मागणीला जोर आला असून राष्ट्रवादीने यावर आपली भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासंदर्भात पत्रकार परिषद घेत आहेत.
13:02 March 22
लोकसभेत जबलपूरचे खासदार राकेश सिंह
मध्य प्रदेशातील जबलपूरचे खासदार राकेश सिंह यांनी खंडनीप्रकरणी सीबीआयकडून चौकशी करण्याची मागणी केली. हे प्रकरण लहान नाही. महाराष्ट्रातून किती वसूली करण्यात आली, याबाबत माहिती समोर आली पाहिजे.
13:01 March 22
लोकसभेत भाजपाचे खासदार मनोजभाई कोटक
भाजपाचे खासदार मनोजभाई कोटक यांनी खंडनीप्रकरणावरून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. जर मुंबईमध्ये असे हाल असतील. तर संपूर्ण महाराष्ट्रातील शहरांची काय स्थिती असेल, असे ते म्हणाले. या खंडनीप्रकरणी सीबीआयकडून चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा, असेही ते म्हणाले.
12:17 March 22
लेटर बॉम्बने राज्यातील राजकारण तापलं; वाचा आजच्या सर्व घडामोडी एका क्लिकवर..
मुंबई - परमबीर सिंह यांच्या लेटर बॉम्बने महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्यास सांगितल्याच्या परमबीर सिंहांच्या आरोपानंतर विरोधक आक्रमक झाले. पत्रानंतर महाविकास आघाडी सरकारवर अनेक प्रकारचे आरोप केले जात आहेत. थेट गृहमंत्री यांच्या राजीनाम्याची विरोधकांकडून मागणी केली जात आहे. राज्यातील राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर पत्रातून गंभीर आरोप केले. मात्र, त्याची पडताळणी केली असता, त्यामध्ये काही तथ्य नसल्याचे आढळून आले. त्यांनी पत्रात उल्लेख केलेल्या तारखेप्रमाणे पाहिले असता, त्यावेळी अनिल देशमुख नागपुरात होते. त्यामुळे या तथ्यहिन आरोपांमुळे देशमुखांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच नसल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले.
महिन्याला 100 कोटी रुपये खंडणी वसुल करण्याचे टार्गेट दिल्याच्या पत्रातील आरोपाचे आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणांचे पडसाद आज राज्यसभेतही पाहायला मिळाले. यावेळी राज्यसभेच्या सभापतींनी परवानगी नाकारली असतानाही भाजपाच्या खासदारांनी महाराष्ट्रातील गृहमंत्री देशमुख, परमबीरसिंग यांचे पत्र आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर सभागृहात गदारोळ निर्माण झाल्यानंतर सभापतींनी सभागृहाचे कामकाज स्थगित केले.