मुंबई -होऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणूक पाहता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray Maharashtra Doura) हे सक्रीय झाले आहेत. 14 डिसेंबरपासून ते महाराष्ट्र दौऱ्याला निघत आहेत. मराठवाड्यामधील औरंगाबादमधून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. या दौऱ्याच्या माध्यमातून राजकीय वातावरण तयार करण्याचा प्रयत्न राज ठाकरे यांचा असल्याचे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त (Political expert on Raj Thackeray Daura) केले आहे.
राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तसेच महानगरपालिकेच्या निवडणुका पाहता राज्यातील सर्वच पक्ष या निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. या निवडणुकांच्या तयारीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे 14 डिसेंबरपासून महाराषट्राच्या दौऱ्यावर ( जाणार असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली. 14 डिसेंबरला औरंगाबादपासून राज ठाकरे यांचा दौरा सुरू होईल. औरंगाबादला मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार असून, होऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणुकीसाठी आपल्या पक्षाच्या तयारीबाबत राज ठाकरे आढावा घेणार आहेत. तर तिथेच 16 डिसेंबरला पुण्यातून पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात ते करणार आहेत. त्यानंतर राज ठाकरे विदर्भ, कोंकण पिंजून काढणार आहेत. या दौर्यातून राजकीय माहोल तयार करण्याचा प्रयत्न राज ठाकरे यांचा आहे. मात्र याआधीही राज ठाकरे यांनी निवडणुकांआधी अशा प्रकारचे दौरे काढले होते. या दौऱ्याला भरघोस प्रतिसाद राज्यातील जनतेकडून दिला. मात्र तो प्रतिसाद मतपेटी मधून दिसत नाही. त्यामुळे या दौऱ्याचा निवडणुकीसाठी किती फायदा होईल याबाबत निवडणुकीच्या निकालानंतरच समजू शकेल असं मत राजकीय विश्लेषक अजय वैद्य यांनी व्यक्त केले.
महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मनसेने कसली कंबर -
राज्यात पाच महत्त्वाच्या महानगरपालिकांच्या निवडणुका तोंडावर आहेत. मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, नाशिक या महानगरपालिकेच्या निवडणुकीत अस्तित्व टिकवण्यासाठी राज ठाकरे यांना प्रयत्न करावे लागणार आहेत. गेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये नाशिक वगळता इतर महानगरपालिकांमध्ये मनसेला आपलं अस्तित्व टिकवून ठेवताना तारेवरची कसरत करावी लागली होती. तशीच काहीशी परिस्थिती यावेळी होऊ नये यासाठी राज ठाकरे यांना महाराष्ट्र दौरा करावा लागत आहे.