महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Operation Lotus Maharashtra : फडणवीसांनी दिल्लीत घेतली अमित शाह यांची भेट - Amit Shah

राज्याचे विधानसभा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दोन दिवसांपूर्वी दिल्लीत जाऊन गुप्त भेट घेतली. या भेटीची माहिती आता समोर येत असून या भेटीनंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

ऑपरेशन लोटस
ऑपरेशन लोटस

By

Published : Jul 2, 2021, 10:23 PM IST

Updated : Jul 2, 2021, 10:33 PM IST

मुंबई -दोन दिवसांपूर्वी गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात दिल्लीमध्ये दोन तास बैठक पार पडली असल्याची माहिती समोर येत आहे. या बैठकीत "ऑपरेशन लोटस" (Operation Lotus) आणि देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तारात मिळणाऱ्या जागेबाबत चर्चा झाली असल्याचे मत विश्लेषकांकडून मांडण्यात येत आहे.

हेही वाचा -अमित शहांच्या पायगुणांनी सत्ता येण्यापेक्षा राज्यामध्ये शांतता निर्माण व्हावी - वडेट्टीवार

गुप्त भेट

राज्याचे विधानसभा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दोन दिवसांपूर्वी दिल्लीत जाऊन गुप्त भेट घेतली. या भेटीची माहिती आता समोर येत असून या भेटीनंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. केंद्रीय गृहमंत्री शाह आणि फडणवीस यांच्यात दिल्लीत दोन दिवसापूर्वी झालेली गुप्त भेट जवळपास दोन तास चालली. या दोन तासात राज्यात असलेल्या राजकीय परिस्थितीबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. तसेच या बैठकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी देखील देवेंद्र फडणवीस यांची 20 मिनिटे चर्चा झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

राज्यात ऑपरेशन लोटस राबवणार?

राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासूनच हे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीचा असल्याचा आरोप महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे या बैठकीत राज्यामध्ये "ऑपरेशन लोटस" राबवण्याबाबत चर्चा झाल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे मत राजकीय विश्लेषक अजय वैद्य यांनी व्यक्त केले. सध्या महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर भारतीय जनता पार्टीकडून थेट आरोप केले जात आहेत. तसेच या आरोपांबाबत केंद्रीय तपास यंत्रणेकडून चौकशी व्हावी, अशी मागणीही करण्यात येत आहे. प्रताप सरनाईक आणि अनिल देशमुख यांची ईडी (प्रवर्तन निदेशालय)यांच्यामार्फत सध्या चौकशी सुरू आहे. तर तिथेच जरंडेश्वर साखर कारखाना घोटाळाप्रकरणी अजित पवार यांच्या नातेवाईकांवर ईडीमार्फत कारवाई सुरू झाली आहे. तर परिवहन मंत्री अनिल परब यांच्याही चौकशीची भाजपाकडून मागणी होत आहे. शिखर बँक घोटाळाप्रकरणी अजित पवार यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमैया यांनी केली आहे. एकूणच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत दबाव वाढवण्याचे काम सुरू असल्याचे मत वैद्य यांनी व्यक्त केले. कर्नाटक आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीकडून "ऑपरेशन लोटस" राबवण्यात आले होते. तर राजस्थानमध्ये देखील भारतीय जनता पार्टीचा "ऑपरेशन लोटस"चा प्रयत्न होता. मात्र सध्या राज्यातली परिस्थिती पाहता "ऑपरेशन लोटस"चा कोणताही प्रभाव महाविकास आघाडी सरकारवर पडणार नसल्याचे विश्लेषकांचे मत आहे.

हेही वाचा -'इथे कोणताही धोका नाही'... भाजपचे नेते स्वप्न पाहतायत

केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तार, फडणवीस यांच्या नावाची चर्चा

केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तार पावसाळी अधिवेशनाआधी करण्याचा मानस केंद्र सरकारचा आहे. या मंत्रीमंडळ विस्तारात महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत देखील फडणवीस यांची शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मात्र आपण सध्या तरी दिल्लीला जाणार नसून, राज्याच्या राजकारणातच सक्रिय राहणार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

काँग्रेसकडून देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा

केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तारात देवेंद्र फडणवीस यांना मंत्रिपद दिले जाऊ शकते. याबाबत काँग्रेसकडून फडणवीस यांना शुभेच्छा देण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीस हे दिल्ली केंद्रीय मंत्री होत असतील तर त्यांना आमच्या शुभेच्छा असल्याचे सांगितले आहे. तर तिथेच दिल्लीतील पक्षश्रेष्ठींना विविध कामांसाठी भेटण्यासाठी जावे लागते. आम्ही अनेक वेळा पक्षश्रेष्ठींना भेटण्यासाठी दिल्लीला जात असतो. त्यामुळे अशा भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा होत असतात, असे मत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले आहे.

Last Updated : Jul 2, 2021, 10:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details