महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मराठा आरक्षण तिढा : पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेच्या विरोधात खुल्या वर्गातील विद्यार्थी आक्रमक - अध्यादेश

मराठा विद्यार्थ्यांचा प्रश्न सुटावा यासाठी शुक्रवारी अध्यादेश काढण्यात आला. पण त्यामुळे खुल्या गटात पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी नाराज झाले आहेत.

वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेबाबत माहिती देताना खुल्या प्रवर्गातील विद्यार्थिनी

By

Published : May 18, 2019, 8:30 AM IST

मुंबई - वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा तिढा सुटताना दिसत नाही. अशातच पुन्हा एक नवी समस्या निर्माण झाली आहे. मराठा विद्यार्थ्यांचा प्रश्न सुटावा यासाठी शुक्रवारी अध्यादेश काढण्यात आला. पण त्यामुळे खुल्या गटात पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी नाराज झाले आहेत. एका समाजाला खूश करण्यासाठी सरकार आमच्यावर अन्याय करत असल्याच्या खुल्या गटातील विद्यार्थ्यांच्या भावना आहेत.

मराठा वैद्यकीय विद्यार्थ्यांचे आंदोलन आता अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेच्या सरकारच्या स्थगितीला खुल्या वर्गातील वैद्यकीय विद्यार्थ्यांनी विरोध केला आहे. मराठा विद्यार्थ्यांच्या आरक्षणाचा घोळ सरकारने घातला आहे. त्याचा मनस्ताप आम्हाला का? असा सवाल खुल्या वर्गातील विद्यार्थी डॉ. सोनम तुरकर हिने विचारला आहे.

सरकारच्या धोरणाचा विद्यार्थ्यांना आझाद मैदानावर आंदोलन करुन निषेध करायचा आहे. मात्र, पोलीस या विद्यार्थ्यांना परवानगी नाकारत आहेत. यामुळे हे विद्यार्थी हवालदिल झाले आहेत. लोकतांत्रिक मार्गाने आंदोलन न करता येणे हा लोकशाहीतला काळा दिवस आहे. आम्हाला आमचे म्हणणे मांडू दिले जात नाही. विद्यार्थ्यांना आंदोलनाला परवानगी दिली पाहिजे, असे मत या विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. यावेळी आंदोलन करण्यासाठी मराठा समाजाला एक न्याय आणि इतरांना एक न्याय का? असा प्रश्न खुल्या गटातील विद्यार्थ्यांनी विचारला.

मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग करून राज्य सरकार राज्याचा अधिकार वापरण्याचा प्रयत्न करत आहे. जर आझाद मैदान येथे खुल्या गटातील विद्यार्थ्यांना आंदोलनाला बसता येत नसेल तर त्यांना दुसरीकडे परवानगी द्यावी, असे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details