मुंबई– कायद्याप्रमाणे एका माणसाला दोन पत्नी असतील तर एकाच पत्नीला संपत्तीचा हक्क मागता येतो, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. तर दोन्ही पत्नींच्या मुलींना पित्याच्या संपत्तीत हक्क असतो, असेही मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. कोरोनाने निधन झालेल्या पोलिसाच्या दोन पत्नींनी राज्य सरकारकडून मिळणाऱ्या मदतीवर दावा केला आहे. या प्रकरणात न्यायालयाने मत नोंदविले आहे.
महाराष्ट्रात रेल्वे पोलीस दलात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून सेवा करणारे सुरेश हटणकर यांचे 30 मे रोजी कोरोनाने निधन झाले. राज्य सरकारने कर्तव्यावर असलेल्या पोलिसाचा मृत्यू झाल्यानंतर 65 लाखांची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. हटनकर यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या दोन्ही पत्नींनी राज्य सरकारकडून मिळणाऱ्या 65 लाखांच्या मदतीवर दावा केला आहे.
हटनकर यांच्या दुसरी पत्नीची मुलगी श्रद्धा यांनी मिळणाऱ्या मदतीत हिस्सा मिळावा, अशी मुंबई उच्च न्यायालयाकडे मागणी केली. न्यायालय निर्णय घेईपर्यंत सरकारकडून देण्यात येणारी मदत न्यायालयात जमा करू, राज्य सरकारचे वकील ज्योती चव्हाण यांनी असे सांगितले. त्यांनी औरंगाबादच्या खंडपीठाने दिलेल्या निकालाचाही दाखला दिला.
हटनकर यांची पहिली पत्नी सुभद्रा आणि मुलगी सुरभी यांनी हटनकर यांच्या दुसऱ्या कुटुंबाबत कधीही माहिती नव्हती, असा दावा केला. मात्र, हटनकर यांच्या दोन्ही लग्नाविषयी सुरभी आणि सुभद्रा यांना माहिती होती, असे श्रद्धा यांचे वकील प्रेरक शर्मा यांनी न्यायालयाला सांगितले. त्यांनी फेसबुकवरही संपर्क केल्याचे वकील शर्मा यांनी न्यायालयाला सांगितले. कायद्यानुसार दुसऱ्या पत्नीला कदाचित काहीही मिळत नाही. मात्र, दुसऱ्या पत्नीच्या मुलीला संपत्ती मिळते. पहिल्या पत्नीच्या मुलीलाही संपत्तीवर हक्क सांगता येतो, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले.