मुंबई -मुंबईत कोरोनाचा प्रसार होत असल्याने रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने आयसीयू आणि व्हेंटिलेटर बेडची कमतरता जाणवत आहे. मुंबईत आयसीयूचे 40 तर व्हेंटिलेटरचे फक्त 14 बेड रिक्त आहेत. यामुळे आयसीयू आणि व्हेंटिलेटरच्या बेडसाठी रुग्णांच्या नातेवाईकांना वणवण फिरावे लागत आहे. यासाठी येत्या 15 दिवसात 4 जम्बो कोविड सेंटर उभारली जाणार आहेत. त्यात 5 हजार 300 बेड आणि 800 आयसीयू असणार आहेत.
आयसीयू, व्हेंटिलेटरचा तुटवडा -
15 एप्रिलच्या आकडेवारीनुसार जम्बो कोविड सेंटर आणि इतर कोविड सेंटरमध्ये एकूण 26 हजार 906 खाटा आहेत. त्यापैकी 21 हजार 228 खाटांवर रुग्ण असून 5 हजार 678 खाटा रिक्त आहेत. पालिका सरकारी रुग्णालयात 20 हजार 044 खाटा आहेत. त्यापैकी 16 हजार 308 खाटांवर रुग्ण असून 3 हजार 736 खाटा रिक्त आहेत. ऑक्सिजनच्या 10 हजार 183 खाटा आहेत. त्यापैकी 8 हजार 962 खाटांवर रुग्ण असून 1 हजार 221 खाटा रिक्त आहेत. आयसीयूच्या 2 हजार 692 खाटा आहेत. त्यापैकी 2 हजार 652 खाटांवर रुग्ण असून 40 आयसीयू बेड रिक्त आहेत. व्हेंटिलेटरच्या 1 हजार 349 खाटा आहेत. त्यापैकी 1 हजार 335 बेडवर रुग्ण असून 14 बेड रिक्त आहेत. मुंबईत आयसीयूच्या आणि व्हेंटीलेटरच्या खाटा कमी प्रमाणात रिक्त आहेत. मात्र कोविड सेंटर, पालिका रुग्णालय, सरकारी रुग्णालयात 9 हजार खाटा रिक्त आहेत, त्यात ऑक्सिजनच्या 1 हजार 221 खाटा रिक्त आहेत.
रेमडेसिवीरचा मुबलक साठा -
कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर केला जातो. त्यामुळे या इंजेक्शनचा राज्यात तुटवडा आहे. मुंबईतही अनेक ठिकाणी या इंजेक्शनचा काळाबाजार सुरू आहे. यामुळे खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना वणवण भटकावे लागत आहे. मात्र मुंबई महापालिकेकडे 22 हजार रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा आहे. 2 लाख इंजेक्शनची ऑर्डर देण्यात आली आहे.
ऑक्सिजनचा योग्य पुरवठा -