मुंबई - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन नागरिकांची किराणामाल आणि भाजीपाल्याची गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्र सहकार विकास मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणीची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.
जीवनावश्यक वस्तूंची ऑनलाईन नोंदणी; पणन मंत्री बाळासाहेब पाटलांची माहिती - online grocery booking
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन नागरिकांची किराणामाल आणि भाजीपाल्याची गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्र सहकार विकास मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणीची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.

आतापर्यंत जवळपास तीन हजार ७०० सहकारी गृहनिर्माण संस्थांनी महामंडळाच्या www.mahamcdc.com या संकेतस्थळावर ऑनलाईन भाजीपाला, अन्नधान्याची नोंदणी केली आहे.
ऑनलाईन नोंदणी व्यतिरिक्त अनेक सहकारी गृहनिर्माण संस्थांना शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत थेट भाजीपाला पुरवठा करण्यात येत असल्याचे पाटील यांनी सांगितले.
कोरोनाचे संकट लक्षात घेऊन केंद्र सरकारने देशात ३ मे २०२० पर्यत लॉकडाऊनचा कालावधी वाढवला आहे. या वाढीव कालावधीत देखील जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत सुरू राहण्यासाठी पाटील यांनी जिल्हा उपनिबंधकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी ऑनलाईन व्यवस्था करण्यात आल्याची माहिती दिली.
मुंबई आणि पुण्यातील गृहनिर्माण संस्थावरील ऑनलाईन बुकिंगसाठी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. सर्व विभागीय सहनिबंधक तसेच जिल्हा उपनिबंधक आणि सहाय्यक निबंधक यांनी त्यांचे कार्यक्षेत्रातील सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांना संपर्क साधून त्यांना शेतकरी उत्पादक गट उत्पादक कंपन्यांमार्फत थेट फळे आणि भाजीपाला पुरवठा करण्यासाठी प्रयत्न करावेत,असे आवाहन पाटील यांनी केले.