मुंबई - कोरोनानं जगाला हैराण केलं. याला आपला महाराष्ट्र, भारत देखील अपवाद राहिला नाही. आर्थिक महासत्ता असणाऱ्या देशात कोरोनामुळे लॉकडाऊन झाला. भारतासारख्या विकसनशील देशाला कोरोनाचा जबर फटका बसणार होता. नवा रोग नवं आव्हान होतं. औषध माहित नव्हती संसर्गजन्य रोग असल्यानं लॉकडाऊन हाच पर्याय दिसत होता. भारतात लॉकडाऊन लागला आणि सगळं क्षणार्धात ठप्प झालं. कोरोना महाराष्ट्रात येऊन वर्ष पूर्ण झालं. लॉकडाऊन, जनता कर्फ्यु याची वर्षपूर्ती होते. पाहुयात सविस्तर वृत्तांत...
हेही वाचा -'ती' कागदपत्रे म्हणजे भिजलेला लवंगी फटाका; त्याला वातही नव्हती - संजय राऊत
- मजुरांची पायपीट
देशासह राज्यात लॉकडाऊन लागला. सर्व जनजीवन ठप्प झालं. रोजगार बंद झाला. पोटाची खळगी भरण्यासाठी शहराकडे धाव घेतलेले मजूर पुन्हा आपल्या गावाकडे पायी चालत जाऊ लागले. पोटात अन्नाचा कण नाही, सूर्य उगवल्यापासून ते मावळेपर्यंत फक्त चालत राहायचं आपलं घर येईपर्यंत. रात्रीच्या वेळी मिळेल त्या ठिकाणी थकलेलं शरीर टाकून द्यायचं आणि थोडीशी विश्रांती घ्यायची. या अशा परिस्थितीत अनेक अपघातही घडले त्यात अनेकांचे प्राण गेले, विश्रांती करण्यासाठी काही मजूर रात्रीच्या अंधारात रेल्वे रुळावर झोपले होते मात्र त्यांची ती अखेरची रात्र ठरली. कुणी हात गाडीचा वापर करून आपल्या घराकडे निघाले होते. तर कुणी सुटकेसवर झोपून आपला प्रवास करत होतं. काही दृश्य तर इतकी विचलित करणारी होती की, लहान चिमुकल्याला आपली आई देवाघरी गेली आहे हे कळालच नाही, तो चिमुकला या लॉकडाऊनमध्ये आपल्या आईच्या मृतदेहासोबत खेळतच राहिला.
- दिवे लावले टाळ्या, थाळ्या वाजवल्या
सुरुवातीच्या टप्प्यात हा लॉकडाऊन जणू एक मोठा इव्हेंट आहे की काय असं वाटत होतं. जमिनीवरची परिस्थिती मात्र वेगळीच होती. फ्रन्टलाइन वर्कर, आरोग्य कर्मचारी यांचा उत्साह वाढविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला टाळ्या वाजवण्याचे आवाहन केलं. मात्र, जनतेनं सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत रस्त्यावर मोठ्या रॅली आयोजित केल्या.
- नोकऱ्या गेल्या, रोजगार बुडाला
लॉकडाऊनमध्ये अनेकांचे रोजगार बुडाले. अनेकांच्या वेतनात कपात झाली. अनेक कंपन्या बंद झाल्या. दोन वेळच्या जेवणाची अनेकांना भ्रांत पडली. मुंबईत तीन ते चार लाख स्थलांतरित मजुरांना महापालिकेने जेवणाची सोय केली याचा खर्च जवळपास 120 कोटी असल्याचं सांगितलं जातं. या काळात अनेक स्वयंसेवी संस्था समोर आल्या आणि मदतीचे हात पुढे केले. मुंबईत ही परिस्थिती जून महिन्याच्या अखेरपर्यंत होती.