मुंबई- क्रॉफर्ड मार्केटमधून 20 भारतीय रुफ जातीची कासवं जप्त करण्यात आली. या प्रकरणी बिलाल मोहम्मद हनिफ शेख या तस्कराला अटक करण्यात आली आहे. बिलालच्या चौकशीत तो पोपटाची तस्करी करत असल्याचे आढळून आले. त्याने दिलेल्या माहितीनुसार एका घरात छापा टाकून पोपट जप्त करण्यात आले. बिलाल कोणासाठी काम करतो, याचा शोध घेण्यात येत आहे.
धक्कादायक : क्रॉफर्ड मार्केटमधून कासवांसह पोपटांची तस्करी, तस्कराच्या आवळल्या मुसक्या - कासव
कासवासह पोपटाची तस्करी करणाऱ्या तस्कराच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. त्याच्याकडून भारतीय रुफ जातीची कासवं जप्त करण्यात आली आहेत.
शेख याच्यावर या आधीही वन्यजीवांच्या तस्करी प्रकरणी विविध गुन्हे दाखल आहेत. वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभाग, वनविभाग मुंबई यांनी अॅनिमल वेल्फेअर या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने पश्चिम विभाग उपसंचालक एम. एम. मरांको आणि ठाणे येथील वनाधिकारी अर्जुन म्हसे यांच्या मार्गदर्शनखाली कारवाई करण्यात आली. शेखचा मोबाईल तपासला असता, पोपट लपवून ठेवल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार आम्ही कारवाई केली, असे वनाधिकारी युवराज गीते यांनी सांगितले. या प्रकरणात आणखी तस्कर शेख बरोबर सहभागी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 नुसार इंडियन रुफ जातीचे कासव सूची 1 तर पोपट सूची 2 मध्ये येतात. यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती अॅनिमल वेल्फेअर स्वयंसेवी संस्थेचे सुनिश कुंजू यांनी दिली.