मुंबई - राज्यातील मेळघाटातील कुपोषणामुळे (Malnutrition in Melghat) होणारे बालमृत्यू रोखण्यात यावेत म्हणून सामाजिक कार्यकर्ते बंडू साने व डॉ. राजेंद्र बर्मा यांनी मुंबई उच्च न्यायालयात (Petition in Mumbai High Court) जनहित याचिका दाखल केली होती. याचिकेवर आज (दि.14 ) मुंबई उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी करण्यात आली. त्यावेळी न्यायालयाने राज्यातील कुपोषणाचे एक कारण बालविवाह असल्याचे निरीक्षण सुनावणीदरम्यान नोंदवले आहे.
न्यायमूर्ती यांनी म्हटले आहे की, कमी वयात मुलं जन्माला घातल्याने ती दगावण्याचे प्रमाण जास्त आहे का? दुर्गम भागात याबाबत जनजागृतीची गरज आहे. तसेच 16 आदिवासी जिल्ह्यात यावर सर्व्हे करून अहवाल सादर करण्याचे राज्य सरकारला मुंबई उच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत.
कुपोषणामुळे राज्यात लहान मुलांचा तसेच गर्भवती मातांचा मृत्यू रोखण्यासाठी सरकारने गेले काही महिने युद्धपातळीवर प्रयत्न केले आहेत. सरकारच्या या प्रयत्नांचा परिणाम चांगला झाला असून, कुपोषणामुळे दगावणाऱया बालकांची संख्या कमी झाली आहे. मेळघाटात ऑगस्ट 2021 पर्यंत महिन्याला 40 बालकांचा कुपोषणामुळे मृत्यू होत असे, मात्र नोव्हेंबर ते जानेवारी 2022 पर्यंत महिन्याला 20 बालके दगावली असून, ही संख्या निम्म्याने घटली आहे, अशी कबुली याचिकाकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाला दिली.