मुंबई- मुंबईत अनेक ठिकाणी उंदरांचा सुळसुळाट आहे. उंदरांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेच्या कीटकनाशक विभागाद्वारे विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहीमेतंर्गत जानेवारी ते जून २०२१ या सहा महिन्यांच्या कालावधीत तब्बल १ लाख ५९ हजार ५६४ उंदरांना पकडून मारण्यात आले आहे. या मोहिमेद्वारे उंदरांच्या संख्येवर नियंत्रण आणले जात असून पावसाळी आजार पसरू नये अशी काळजी घेतली जात आहे अशी माहिती पालिकेच्या कीटकनाशक विभागाचे प्रमुख राजन नारिंग्रेकर यांनी दिली.
मुंबईत लेप्टोच्या प्रतिबंधासाठी सहा महिन्यात दीड लाख उंदरांना मारले - लेप्टो प्रतिबंध
लेप्टो, मलेरिया, एच-वन एन-वन, गॅस्ट्रो, हेपटायसिस आणि डेंग्यू यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिकेचा कीटकनाशक विभागही सरसावला आहे. मुंबईत दरवर्षी पावसाचे पाणी साचते. या साचलेल्या पाण्यात उंदीर, गायी, म्हशी, घोडे, कुत्रे आणि मांजर यांचे मलमूत्र असल्यास आणि त्याचा संपर्क जखम असलेल्या व्यक्तीबरोबर आल्यास अशा व्यक्तीला लेप्टो स्पायरेसिसचा संसर्ग होतो.
पावसाळी आजारांवर नियंत्रणाचे आव्हान -
मुंबईत गेले वर्षभराहून अधिक काळ कोरोनाचा प्रसार आहे. या प्रसारादरम्यान कोरोनाची दुसरी लाट आली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी मुंंबई महानगरपालिका अहोरात्र मेहनत घेत असतानाच पावसाळी आजारांवर नियंत्रण ठेवण्याचे दुहेरी आव्हानही पालिका यशस्वीपणे हाताळत आहे. लेप्टो, मलेरिया, एच-वन एन-वन, गॅस्ट्रो, हेपटायसिस आणि डेंग्यू यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिकेचा कीटकनाशक विभागही सरसावला आहे. मुंबईत दरवर्षी पावसाचे पाणी साचते. या साचलेल्या पाण्यात उंदीर, गायी, म्हशी, घोडे, कुत्रे आणि मांजर यांचे मलमूत्र असल्यास आणि त्याचा संपर्क जखम असलेल्या व्यक्तीबरोबर आल्यास अशा व्यक्तीला लेप्टो स्पायरेसिसचा संसर्ग होतो.
विशेष मोहीम -
लेप्टोचा प्रसार रोखण्यासाठी पावसाळ्यापूर्वी म्हणजे मार्च ते एप्रिलपर्यंत विशेष मोहीम सुरू केली जाते. साचलेल्या पाण्यात लेप्टोचा प्रसार होत असल्यामुळे पावसाळ्यात पाणी साचण्याची जी जी ठिकाणे असतात त्या ठिकाणी विशेष मोहीम राबवली जाते. उंदरांना हाताने मारण्याबरोबरच अॅल्युमिनिअम फॉस्फाईडच्या गोळ्या टाकून मारले जाते. पावसाळ्याआधी प्रत्येक ठिकाणी तीन ते चार वेळा ही मोहीम राबवली जाते. पावसाळ्यात ही मोहीम बंद असते. मात्र, ज्यावेळी दोन ते चार दिवस पाऊस पडत नाही, त्यावेळी पुन्हा गोळ्यांचा वापर केला जातो. त्यामुळे उंदरांच्या संख्येवर नियंत्रण राहते. त्याचबरोबर ज्या व्यक्तीला लेप्टो झाला आहे, अशा व्यक्तीला उंदिर पकडण्यासाठी पालिकेच्यावतीने पिंजरा दिला जातो, अशी माहिती राजन नारिंग्रेकर यांनी दिली.