मुंबई - मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाच्या आजाद मैदान युनिटने केलेल्या कारवाईदरम्यान तब्बल 12 लाख रुपयांचे 100 ग्रॅम एमडी हे अमली पदार्थ जप्त केले आहे. तसेच एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
बारा लाखांच्या 'एमडी'सह एका आरोपीला मुंबईत अटक - mumbai police
अमली पदार्थविरोधी पथकाच्या आजाद मैदान युनिटने केलेल्या कारवाईदरम्यान तब्बल 12 लाख रुपयांचे 100 ग्रॅम एमडी हे अमली पदार्थ जप्त केले आहे.
मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाच्या आजाद मैदान युनिटला 14 जून रोजी मिळालेल्या गुप्त माहितीवरून मुंबईतील गोवंडी पश्चिम परिसरातील मुंबई महानगरपालिकेच्या एम वॉर्ड जवळ असलेल्या देवनार वजन काटा या ठिकाणी सापळा रचण्यात आला होता. या ठिकाणी मोहसिन कयूम सय्यद (35) नावाचा अमली पदार्थ तस्कर संशयास्पदरित्या पोलिसांना वावरताना आढळून आला. यानंतर त्यास ताब्यात घेतले असता त्याच्या झडतीत 100 ग्राम एमडी ( मेफेड्रोन) अमली पदार्थ मिळून आले. आंतरराष्ट्रीय बाजारात या पदार्थाची किंमत तब्बल 12 लाख रुपये असल्याचे समोर आले आहे.
अटक करण्यात आलेला आरोपी मोहसिन कय्युम सय्यद हा एमडी सारख्या अमली पदार्थांची खरेदी -विक्री गेल्या काही वर्षांपासून गोवंडी परिसरात करत असल्याचं समोर आले आहे. आतापर्यंतच्या पोलीस तपासात सदरचा आरोपी एका मोठ्या टोळीत सहभागी असल्याचं समोर आले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. अटक आरोपीला न्यायालयाने 21 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.