मुंबई -कोरोनाबाधित रुग्णांसाठी उभारण्यात आलेल्या वांद्रे कुर्ला संकुलातील (बीकेसी) कोविड 19 उपचार केंद्राला मागील वर्षी निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार फटका बसला होता. आता पुन्हा अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर कोविड सेंटरला कोणतेही नुकसान होऊ नये, या दृष्टिकोनातून महानगरपालिकेकडून विशेष काळजी घेण्यात येत आहे. या ठिकाणी झाडांची छाटणी तसेच बांधकामाचे चाचपणी करण्याचा येत आहे, याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांनी.
चक्रीवादळाचा धोका नसला तरी पालिका सतर्क
अरबी समुद्रात सध्या मोठ्या प्रमाणात दाट ढग जमा झाले असून हवामान खात्याच्या अंदाजानुसार 14 तारखेला अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होईल आणि त्याची तीव्रता वाढून चक्रीवादळात रुपांतर होणार आहे. 16 तारखेला या चक्रीवादळाचा जोर वाढून महाराष्ट्र आणि गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर त्याचा प्रभाव जाणवेल. तिथे मुसळधार पाऊस आणि वादळी वारे पाहायला मिळतील. या हवामानाचा परिणाम मध्य महाराष्ट्रावरही पाहायला मिळणार आहे. मुंबईला या चक्रीवादळाचा धोका नसला तरी पालिका सतर्क झाली आहे. सध्या कोविड रुग्णालये मैदानात आणि कंपनीच्या जागेवर उभारण्यात आलेला आहे. या चक्रीवादळामुळे कोविड सेंटरना कोणत्याही प्रकारचा धोका उद्भवू नये यासाठी पालिकेकडून विशेष नियोजन करण्यात येत आहे. मुलुंड जम्बो कोविड सेंटरमधील झाडांची छाटणी करण्यात आली आहे. त्याबरोबर बांधकामाची तपासणी देखील करण्यात आली आहे. जर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर, काय करायचे याचे नियोजन देखील करण्यात आले, असल्याचे मुलुंड जम्बो कोविड सेंटरचे प्रमुख प्रदीप आंग्रे यांनी सांगितले.