मुंबई : राज्यात सध्या भोंगे चर्चेत आहेत. सर्व मशिदींवरील भोंगे ( Loudspeaker On Mosque ) तीन तारखेपर्यंत उतरले नाही तर येणाऱ्या परिणामांना तयार रहा, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS Chief Raj Thackeray ) यांनी दिला होता. आता हा वाद काही शांत होण्याच्या मार्गावर नाहीये. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या मुंबईतील शिवतीर्थ या निवासस्थानी आज मनसे नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत देखील याच मुद्द्यावर महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला ( MNS Maha Aarti ) आहे. 3 मे रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर भोंगे लावून राज्यभर महाआरती करण्यात येणार आहे.
तीन तारखेला राज्यभर महाआरती :आजच्या या बैठकीबद्दल माहिती देताना मनसेचे प्रमुख नेते बाळा नांदगावकर म्हणाले की, "आमचा तीन तारखेचा अल्टिमेटम आहे. या अगोदर त्यांनी भोंगे उतरवावे तीन तारखेला अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आम्हीदेखील संपूर्ण राज्यभर भोंगे लावून महाआरतीचे आयोजन केले आहे. याला राज्यातील सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी योग्य तो प्रतिसाद देतील. एक तारखेला महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर औरंगाबादेत राज ठाकरे यांची महासभा होणार आहे. या सभेत साहेब तुम्हाला अधिकची माहिती देतीलच," असं बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे.
आयोध्या दौरा राज ठाकरेंच्या सूचना :
पुढे बोलताना नांदगावकर म्हणाले की, "सोबतच राज ठाकरे यांनी पाच जूनच्या आयोध्या दौऱ्याबद्दल आम्हाला काही सूचना केल्या आहेत. त्या सूचना लक्षात घेऊन आम्ही काही त्रुटी राहिल्या होत्या त्या भरून काढणार आहोत. त्यासंदर्भात आमची काही पदाधिकाऱ्यांची पुन्हा एकदा बैठक होईल. हा अयोध्या दौरा अधिकाधिक प्रभावी व यशस्वी करण्यावर आमचा भर असेल." असं नांदगावकर यांनी म्हटलं आहे. दरम्यान, आता बाळा नांदगावकर यांच्या म्हणण्यानुसार मनसेच्या तीन तारखेचा महा आरत्यांचा कार्यक्रम किती यशस्वी होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.