मुंबई- लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य माणसे, मजूर, प्राणी, पक्षी यांचे हाल होतच आहेत. महामार्गालगत अनेक वृक्ष आहेत. लॉकडाऊन काळात माणसांकडे पहायला वेळ नाही, तिथे वृक्ष संगोपनाकडे कोण पाहणार, अशी परिस्थिती आहे. परिणामी त्यात वृक्ष देखील सुकायला लागली आहेत.अशा कठीण परिस्थितीत देखील ग्रीन अम्ब्रेला या संस्थेचे सदस्य मुकुंद महाबळेश्वरकर आणि अजित कंबोज वयाची पर्वा न करता महामार्गाजवळ लावलेल्या 600 वृक्षांना जगवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
झाडाला पाणी घालताना मुकुंद महाबळेश्वरकर ग्रीन अम्ब्रेला ही संस्था निसर्ग संवर्धनासाठी काम करते. मुंबईत दिवसेंदिवस कार्बन-डाय-ऑक्साईड वायूचे प्रमाण वाढत आहे. ते कमी व्हावे, या दृष्टिकोनातून संस्थेच्या माध्यमातून विक्रोळी ते मुलुंड या महामार्गावर पिंपळाची सहाशे वृक्ष लावण्यात आले होती. मार्च, एप्रिल, मे या महिन्यांत वृक्षांना जादा पाणी द्यावे लागते. कारण उन्हाळ्यात झाड सुकण्याची शक्यता जास्त असते. टाळेबंदीच्या काळात झाडांची काळजी कशी घ्यायची, हा प्रश्न संस्थेसमोर उभा राहिला राहिला होता. संस्थेचे अनेक सदस्य हे लांब राहतात. तेव्हा 65 वर्षीय अजित कंबोज आणि 54 वर्षीय मुकुंद महाबळेश्वरकर यांनी या झाडांची काळजी घेण्याचे ठरविले. यानुसार दोघेही आपापल्या परीने या झाडांची काळजी घेत आहेत.
मुकुंद महाबळेश्वरकर हे ठाण्याचे गृहस्थ असून सध्या तेविशेष कोर्टात कार्यरत आहेत. सकाळी कार्यालयात निघताना आपल्या गाडीमध्ये वीस लिटरचे पाण्याचे पाच कॅन आणि पाण्याची बॉटल सोबत घेऊन ते निघतात. ठाण्यातून नाहूरला पोहोचल्यावर त्यांचे काम सुरू होते. गाडीतून पाण्याचे कॅन काढत ज्या झाडांना पाण्याची गरज आहे, अशांना ते पाणी देतात. कार्यालयाला जाताना नाहुर ते विक्रोळी या भागात असलेल्या वृक्षांना पाणी घालतात. कामावरून परत येताना विक्रोळी ते नाहुर या बाजूला असणाऱ्या झाडांना पाणी देतात.
माझे काम खूप छोटे आहे, झाडांनाही जीव असतो. यामुळे मी हे कार्य करत आहे. मला निसर्गाची खूप आवड आहे. आजही अनेक ठिकाणी मी ट्रेकिंगसाठी जात असतो. यामुळे वृक्ष आणि माझा संबंध येतो. आमच्या संस्थेने लावलेली झाडे जगावी, हे आमचे कर्तव्य आहे. लॉकडाऊन काळामध्ये त्यांना कसे सोडणार, असे महाबळेश्वरकर यांनी सांगितले.
विक्रोळी येथे राहणारे 65 वर्षीय अजित कंबोज पहाटे साडेचारला उठून तयारी करतात. दोन पाण्याचे कॅन सायकलला बांधून घरातून निघतात. या मार्गावर असलेल्ल्या 200पेक्षा जास्त झाडांना एक दिवस आड ते पाणी देतात. फक्त पाणी टाकून ते थांबत नाहीत, तर त्या झाडांची छाटणी देखील ते करतात. मला लहानापासून निसर्गावर प्रेम आहे. ट्रेकिंगच्या माध्यमातून मी अनेक गड-किल्ले सर केले आहेत. यामुळे माझे आणि निसर्गाचे नात आणखी घट्ट झाले आहे. आम्ही लावलेली झाडे अजून छोटी आहेत. मी जेव्हा झाडाची छाटणी करतो, तेव्हा त्या झाडाची माफी मागतो. कारण त्याला ही जीव आहे. त्याला ही वेदना होत असतील. पण मी तुझ्या भल्यासाठी करतो आहे, समजवत छाटणी करतो, असे कंबोज यांनी सांगितले.