मुंबई - पुन्हा एकदा मुंबई आणि राज्यात कोरोनाच्या रुग्ण वाढीचा वेग हा वाढला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सिद्धिविनायक मंदिराने भाविकांसाठी दर्शन घेण्याची वेगळी व्यवस्था उभी केली आहे. सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. मंदिर प्रशासनाने भाविकांच्या दर्शनासाठी एक वेगळ्या अॅपची निर्मिती केली आहे. त्यात भाविकांनी आपली माहिती भरून दर्शन घेण्यासाठी वेळ ठरवून घेण्याची व्यवस्था उभी केली आहे. त्यामुळे नाहक होणाऱ्या गर्दीला आळा घालण्यासाठी ही व्यवस्था उभी केली आहे.
सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट अध्यक्ष आदेश बांदेकर दर्शनासाठी आता अॅपची निर्मिती
2 मार्चला अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक मंदिर हे ऑफलाईन दर्शनासाठी बंद असणार आहे. मंदिर प्रशासनाने परिपत्रक काढून जाहीर केलं आहे. मुंबईमधील वाढता कोरोनाचा प्रसार लक्षात घेता या फेब्रुवारी महिन्यात सिद्धिविनायक मंदिरात दर तासाला फक्त 50 भाविकांना दर्शन घेण्याची सुविधा केली होती. म्हणजे दिवसाला फक्त 600 भाविकांना सिद्धिविनायकाच दर्शन भेटत होते. त्यामुळे गर्दी ही नियंत्रणात होती, पण पुढच्या महिन्यात 2 मार्चला अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे. त्यामुळे या दिवशी भाविकांची खूप मोठी गर्दी मंदिर परिसरात होणार याची दखल घेत मंदिर प्रशासनाने 2 मार्च रोजी ऑफलाईन दर्शनाची सोय बंद केली आहे. या दिवशी फक्त ज्यांनी क्यूआर कोड घेतलं आहे त्याच भाविकांना दर्शन घेण्याची सुविधा ठेवण्यात आली आहे. त्यामुळे गर्दी होणार नाही असं मंदिर प्रशासनाला वाटत आहे.
सिद्धिविनायक मंदिराचे परिपत्रक प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर येत्या अंगारकी चतुर्थीला भाविकांसाठी ऑफलाईन दर्शन थांबवत आहे. ज्या भक्तांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे त्यांनाच क्यूआर कोड परवानगी असेल, असा निर्णय घेण्यात आला आहे. कोविडच्या वाढत्या प्रकरणांना लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे, असं मंदिर प्रशासनाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी सांगितलं आहे.