मुंबई -तौक्ते चक्रीवादळादरम्यान मुंबईच्या अरबी समुद्रात पी-305 ही बार्ज बुडाली. या दुर्घटनेत अनेक कर्मचाऱ्यांना नौदलाने आतापर्यत वाचवले आहे. यात 61 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. यातील 31 जणांची ओळख पटली असून, 28 जणांच्या नातेवाईकांनी मृतदेहाचा ताबा घेतला आहे. तर ज्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही अशा मृतदेहांचे डीएनए टेस्ट करून त्यांच्या नातेवाईकांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या प्रकरणी यलोगेट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
तौक्ते चक्रीवादळाच्या विळख्यात अडकलेल्या पी-305 या बार्जवरील कर्मचाऱ्यांच्या बचावकार्यासाठी भारतीय नौदलाच्या बियास, बेतवा आणि तेग या जहाजांनी 'आयएनएस कोची' आणि 'आयएनएस कोलकाता' यांच्यासोबत मिळून बचावकार्यास सुरुवात केली. याबरोबरच नौदलाच्या हेलिकॉप्टरचीसुद्धा या बचावकार्यात मदत घेतली. 17 मे रोजी सुरू झालेली ही मोहीम अद्यापही सुरू असून, आतापर्यंत 188 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.