मुंबई -भारतीयांचे संगीतप्रेम सर्वश्रूत आहे. त्यातच हिंदी चित्रपटांतील संगीत, खासकरून पूर्वीच्या काळातील, अनेकांना भावते. गानकोकिळा स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर म्हणजेच, आपणा सर्वांचीच लाडकी लता दीदी हिला देवाज्ञा झाली आणि पृथ्वीवर शोककळा जरी पसरली असली तरी, स्वर्गात तिचे प्रेमाने जोरदार स्वागत झाले असणार. तब्बल आठ दशके संगीतक्षेत्रात वावरणारी जगातील ती एकमेव गायिका असावी. लता दीदीने सर्वच संगीतकारांबरोबर काम केले, एक सोडून. तो संगीतकार म्हणजे ओ.पी. नय्यर. खरंतर लता दीदीने कधीच त्यांना धुत्कारले नाही. परंतु, हा संगीतकार लता दीदींबद्दल आयुष्यभर आकस धरून जगला.
हेही वाचा -Video : समुद्र, पर्वत, झाडे-वेली याप्रमाणे दीदींचा स्वरही अजरामर
यामुळे लता मंगेशकर आणि ओ.पी. नय्यर ही जोडी कधीच एकत्र आली नाही
१९५२ साली ओ.पी नय्यर यांनी लता दीदींना ‘आसमान’ चित्रपटातील एक गाणे गाण्यासाठी बोलविले होते. त्यावेळी प्रत्येक नायिका पडद्यावर लताच्या आवाजात गाताना दिसे. परंतू ओ.पी. नय्यर यांनी लता दीदींना एका सहनायिकेच्या गाण्यासाठी पार्श्वगायन करण्यास बोलाविले होते. लता दीदी त्यावेळी, म्हणजे नेहमीच, टॉपची गायिका होती आणि एका दुय्यम भूमिकेतील अभिनेत्रींसाठी त्यांनी आवाज देण्यासाठी नकार कळविला. ही गोष्ट ओ.पी. नय्यर यांना खटकली आणि यापुढे आयुष्यात लता मंगेशकरबरोबर काम न करण्याचा प्रण त्यांनी केला. त्यामुळे, लता मंगेशकर आणि ओ.पी. नय्यर ही जोडी कधीच एकत्र आली नाही.
परंतु, लता दीदींनी याचा कधी बाऊ केला नाही आणि कधीही ओ.पी बद्दल वेडंवाकडं बोलल्या नाही. परंतु, सर्वच माणसं सारखी नसतात, हे ओ.पी. नय्यर यांनी सिद्ध केले. त्याचे झाले असे की, एक म्युझिक संस्था जुन्या गाण्यांचे कार्यक्रम करीत असे आणि प्रत्येक प्रोग्रॅममध्ये संगीतक्षेत्रातील एकेका दिग्गजांची गाणी पेश करीत असे. काही वर्षांपूर्वी त्याच अनुषंगाने एक कार्यक्रम ओ.पी. नय्यर यांच्या गाण्यावर सुरू होता. त्या कार्यक्रमाला दस्तुरखुद्द ओ.पी हजेरी लावून होते. त्यांनी कंपोझ केलेली गाणी सादर होत होती आणि ते अधनं मधनं प्रेक्षकांशी संवादही साधत होते.
त्याचवेळी ओ.पी. नय्यर म्हणाले की, “माझ्यामते लता मंगेशकर अत्यंत सुमार गायिका आहे. त्यांचा आवाज अतिशय पातळ आहे आणि ती मी कंपोझ केलेली गाणी गाऊच शकणार नाही. माझ्या बंदिशी खूप अवघड असतात आणि गायकांची दमछाक करणाऱ्या असतात. आणि या कठीण चाली लता गाऊच शकणार नाही. माझ्या लेखी ती सिंगरच नाही.” खरंतर ही विधानं पोरकट होती आणि अनेकांना ती रुचली नाहीत व त्याबद्दल आयोजकांकडे तक्रार करण्यात आली. ओ.पी. नय्यर यांनी लता मंगेशकर यांची आत्ताच्या आत्ता माफी नाही मागितली तर, गहजब होईल, असे कळविले गेले. आयोजकांना त्यातील गांभीर्य कळलं आणि त्यांनी ओ.पी. नय्यर यांना तसे करण्यास सांगितले. परंतु, माफी मागायला ओ.पी. तयार नव्हते परंतु आयोजकांनी जनक्षोभ होईल आणि कोणालाही प्रेक्षागृहाच्या गेटच्या बाहेरही पडत येणार नाही, असे सांगितले. एव्हाना थिएटरच्या बाहेरही गर्दी जमायला सुरुवात झाली होती. त्यामुळे, ओ.पी. नय्यर स्टेजवर आले आणि आपण लताजींबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागत आहोत, असे सांगितले आणि ताबडतोब थिएटर बाहेर पडून, अर्धा कार्यक्रम बाकी असूनदेखील, तडक घरी निघून गेले.
हा प्रोग्रॅम षण्मुखानंद हॉलमध्ये झाला होता आणि आमचे प्रतिनिधी कीर्तिकुमार कदम सदर कार्यक्रमाला उपस्थित होते. यातून हेच सिद्ध होते की, लता दीदींचा द्वेष करणारे अनेक होते. परंतु, लता ताईंनी कधीही उलटसुलट प्रतिक्रिया दिली नाही.
हेही वाचा -Lata Mangeshkar Funeral : अखेरचा हा तुला दंडवत..