मुंबई - कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना राज्यातील अनेक जिल्हात लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील एसटी बसेस पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने धावू लागले आहे. आठवड्याभरानंतर एसटीची प्रवासी संख्या १२ लाखांच्या घरात पोहोचली असून यामुळे महामंडळाच्या तिजोरीत ६ कोटी ५९ लाख रुपयांचा महसुल जमा झाला आहे. १ जून रोजी एसटीने केवळ २ लाख प्रवाशांच्या वाहतुकीतून ८५ लाखांचे उत्पन्न घेतले होते. मात्र, आता लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळताच एसटीची प्रवासी संख्या वाढत आहे.
७ जूनपासून प्रवासी वाढले -
गेल्या वर्षांपासून कोरोनाच्या पहिल्या लाटेमुळे एसटी महामंडळाला कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. नंतर हळूहळू एसटीची चाक रुळावर येत असतानाच, कोरोनाची दुसरी लाट आली. त्यामुळे राज्यात १५ एप्रिलपासून कडक निर्बंध घालण्यात आले. मात्र, आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना राज्यातील अनेक जिल्हात लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे एसटीची वाहतूक पूर्ण प्रवासी क्षमतेने धावण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे प्रवासी संख्या वाढून उत्पन्नही मिळू लागले. आगोदर दररोज सुमारे ३३ लाख प्रवाशांमुळे १६ कोटी रुपये उत्पन्नाची तिजोरीत भर पडत होती. मात्र, मार्च महिन्यापासून राज्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले. प्रवासी संख्या कमालीची घटली होती. आत ७ जून पासून एसटी पुन्हा पुर्ण आसनक्षमतेने धावू लागली आहे. त्यामुळे एसटीच्या प्रवासी संख्येत वाढ होऊ लागली आहे.