मुंबई- मुंबईत कोरोनाचे दिवसाला सुमारे ३०० रुग्ण रोज आढळून येत आहेत. यामुळे कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत आहे. मात्र आजही इमारतीमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून येत असल्याने मुंबईमधील तब्बल १५२३ मजले सील आहेत. या सील मजल्यांवर २ लाखाहून अधिक मुंबईकर राहत आहेत. बोरिवली, अंधेरी, कांदिवली, मालाड या विभागात सर्वाधिक मजले सील असल्याची तर कुर्ला आणि खार या विभागात एकही मजला सील नसल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
१ हजार ५३२ मजले सील -
मुंबईत ज्या इमारतीमध्ये कोरोना विषाणूची बाधा झालेले ५ पेक्षा जास्त रुग्ण आढळून येतात अशा इमारती सील केल्या जातात. त्याचप्रमाणे ज्या इमारतीत एकाच मजल्यावर दोन पेक्षा अधिक रुग्ण आढळून येतात असे मजले सील केले जातात. ४ ऑगस्टच्या आकडेवारीनुसार मुंबईत १ हजार ५३२ मजले सील आहेत. त्यामध्ये ६७ हजार घरे असून त्यात २ लाख १४ हजार नागरिक वास्तव्य करत आहेत. बोरिवली येथील आर सेंट्रल विभागात २३८ मजले सील आहेत. तर अंधेरी पश्चिम के वेस्ट विभागात १६४, कांदिवली आर साऊथ विभागात १५०, मालाड येथील पी नॉर्थ विभागात १२८, मुलुंडच्या टी विभागात १२२, अंधेरी पूर्व येथील के वेस्ट विभागात १०२ मजले सील आहेत. इतर विभागात शंभरहून कमी मजले सील आहेत. तर कुर्ला येथील एल तसेच खार एच ईस्ट विभागात एकही मजला सील नाही. एकाच इमारतीमध्ये ५ पेक्षा अधिक रुग्ण आढळून आल्यास ती इमारत सील केली जाते. मुंबईत अशा ४१ इमारती सील असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.