मुंबई -राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी लॉकडाऊन करण्याच्या नियोजनाचे आदेश संबंधित विभागाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यामुळे मुंबई आणि उपनगरात काम करणाऱ्या हजारो परप्रांतीय मजुरांनी लॉकडाऊनचा धसका घेत, मुंबई सोडण्यास सुरुवात केल्याचे चित्र रेल्वे स्थानकांवर दिसत आहे. याबाबत ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने रेल्वे स्थानकावरून आढावा घेतला आहे.
परप्रांतीय मजुरांना लॉकडाऊनची भीती...?
गेल्यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला होता. परिणामी संपूर्ण देशाची रेल्वे वाहतूक आणि सार्वजनिक वाहतूक ठप्प होती. त्यामुळे लाखो परप्रांतीय मजुरांनी मिळेल त्या वाहनांच्या मदतीने आपले गाव गाठले होते.या दरम्यान अनेक अपघात होऊन काही जणांचा मृत्यू देखील झाला होता. त्यानंतर शासनाकडून श्रमिक ट्रेन सुरू करण्यात आली होती. श्रमिक ट्रेनच्या माध्यमातून लाखो मजुरांना त्यांच्या घरापर्यंत सुखरूप पोहोचवण्यात आले. मात्र नंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताचं पुन्हा लाखोंच्या संख्येत परप्रांतीय मजूर मुंबईत दाखल झाले. मात्र आता राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने, लॉकडाऊनच्या भीतीने मजुर मुंबईतून आपल्या गावी जाताना दिसत आहेत.
रेल्वे स्थानकांवर मजुरांची गर्दी
होळी व धुलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर आगोदरच परप्रांतीय मजुरांनी आपले गाव गाठले आहे. मात्र, मुंबईत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत अनेकांनी घरीच थाबण्याचा निर्णत घेतला असल्याची माहिती पश्चिम बंगालमधील मजुरांनी दिली आहे. तसेच राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच लॉकडाऊन करण्याचा हालचाली देखील सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आपली गैरसोय टाळण्यासाठी परप्रांतीय मजुरांनी गावाकडची वाट पकडली आहे. दुसरीकडे रेल्वे स्थानकांवर गर्दी होऊ नये, म्हणून रेल्वेकडून सर्वप्रकारची काळजी घेण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणात रेल्वे परिसरात पोलीस तैनात करण्यात आले आहेत.