मुंबई- शहरात गेले काही दिवस ८ ते ११ हजार रुग्ण आढळून येत आहेत. रुग्णांना रुग्णालयात खाटा मिळत नाहीत अशी परिस्थिती असताना गेल्या पाच दिवसापासून मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या स्थिर राहिली असून, मुंबईकरांसाठी ही समाधानाची बाब आहे, असे मत पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी व्यक्त केले आहे. मात्र कोरोनाचा धोका कायम असल्याने मुंबईकरांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहनही चहल यांनी केले आहे.
ही समाधानाची बाब..
मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या गेल्या पाच दिवसांपासून घटत आहे. काल सोमवारी मुंबईत कोरोनाचे 7, 381 रुग्ण आढळून आले होते. आज कोरोनाच्या रुग्णांची संख्या 309ने कमी झाल्याची माहिती पालिका आयुक्त चहल यांनी दिली. मुंबईत 3, 685 कोरोनाचे बेड रिकामे असल्याचेही त्यांनी सांगितले. सध्या उपचार घेत असलेल्या कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी 87 टक्के रुग्ण लक्षणे नसलेले असल्याचे आढळून आले आहेत. पालिका आयुक्त यांनी सांगितले, की गेल्या 70 दिवसात 953 रुग्णांचा मृत्यू झाला. मात्र, हा मृत्यू दर दररोज 0.3 इतका कमी आहे. दिल्ली शहराच्या तुलनेतही हा दर कमी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मृत्यू दर आणि रुग्णवाढीचा दर कमी असल्याने खरोखर ही मुंबईकरांसाठी समाधानाची बाब असल्याचे पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी स्पष्ट केले आहे.
नियमांची कडक अंमलबजावणी..
सर्वाधिक रुग्ण असणाऱ्या विभागांवर पालिकेने अधिक लक्ष वेधून तेथे नियमांची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. रुग्णांवर नियंत्रण आणण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा तातडीने शोध घेऊन संबंधितांना क्वारंटाइन केले जाते आहे. खाटांची संख्या, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आदीची पुरेसा उपलब्धता करण्यात आली असल्याचा आयुक्तांनी केला आहे.