मुंबई - २८ फेब्रुवारी १९२८ या दिवशी 'रामन इफेक्टचा' शोध लागला. या शोधासाठी प्रसिद्ध भौतिक शास्त्रज्ञ सी.व्ही रामन यांना १९३० साली भौतिक शास्त्राचा नोबल पुरस्कार मिळाला होता. रामन यांच्या विज्ञानातील भरीव कामगिरीनिमित्त नॅशनल कौन्सिल फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी कम्युनिकेशनने २८ फ्रेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करण्याची विनंती केली आणि २८ फेब्रुवारी १९८७ ला पहिला राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला. तेव्हापासून आजतागयत भारतात दरवर्षी विज्ञान दिवस साजरा केला जातो.
१९२१ साली रामन यांना समुद्राचे पाणी पाहून ते निळे का दिसते ? हा प्रश्न पडला होता. याबाबत त्यांची नजर जॉन विल्यम रैले यांच्या तर्कावर गेली. आकाशाच्या प्रतिबिंबामुळे समुद्राच्या पाण्याचा रंग निळा दिसतो असे विल्यम यांचे तर्क होते. मग आकाश राखाडी रंगाचे होते, तेव्हा पाणी खराडी रंगाचे का दिसत नाही? हा प्रश्न रामन यांना पडला. त्यामुळे जॉन विल्यम यांच्या मताशी सहमत नसलेले रामन हे स्वतः हे गुढ उकलण्याच्या तयारीला लागले.
हेही वाचा...विज्ञान दिन विशेष : जाणून घ्या, शत्रुला धडकी भरविणाऱ्या महिला शास्त्रज्ञाची कामगिरी
१९२३ साली रामन यांनी काही उपकरणांसह पाणी आणि प्रकाशाच्या विकिरणांचा अभ्यास केला. समुद्राच्या निळाईचे कारण हे प्रकाशाचे पाण्याच्या रेणुंमुळे होणारे विकिरण असल्याचे त्यांनी दाखवून दिले. यानंतर रामन आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी प्रकाशाचे वेगवेगळ्या रंगामध्ये परावर्तीत होण्याबाबत संशोधन केले आणि ते ज्या निष्कर्षावर पोहोचले तो 'रामन इफेक्ट' संबोधला गेला.