मुंबई - भाजप नेते किरीट सोमैया यांच्याकडून माझ्या बदनामीचे षडयंत्र आखले जात आहे. मी कोणतेही चुकीचे काम केलेले नाही. न्यायालयात याप्रकरणी दाद मागितली असून निर्दोषत्व सिध्द होईल, असा दावा परिवहन मंत्री अनिल परब यांनी केला. विधानभवनात ते पत्रकारांशी बोलत होते.
आरोप खोटे ठरतील -
गेले काही महिने किरीट सोमैया पुराव्याविना माझ्यावर आरोप करत आहेत. सोमैयांनी 72 तासांत माफी मागावी, यासाठी वकीलामार्फत नोटीस पाठवली होती. त्यांनी नोटीसला उत्तर दिले नाही. न्यायालयात 100 कोटींचा अब्रुनुकसानीची याचिका दाखल केली आहे. न्यायालयाला त्याप्रकारचे पुरावे दिले आहेत. न्यायदेवतेवर माझा विश्वास आहे. मला न्याय नक्की मिळेल, माझी बदनामी झाली आहे. ती पुसून टाकण्यासाठी मदत होईल. मी कोणतीही गोष्ट चुकीची केलेली नाही. सोमैया यांनी माझ्यावर केलेले सर्व आरोप खोटे आहेत. ते खोटे आहेत हे लवकर सिद्ध होईल, असे अनिल परब यांनी म्हटले.
सोमैयांनी न्यायालयात स्पष्टीकरण द्यावे -
बेछुट आरोप करून प्रतिमा मलिन करण्याचे काम सोमैया यांनी केले आहे. मला पूर्ण खात्री आहे की, आम्ही सर्व यातून निर्दोष सुटू. आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. सोमैया आरोप करतात आणि निर्णयही देतात. न्यायाधीशाचे काम सध्या ते करत आहेत. म्हणूनच मी कोर्टात दाद मागितली आहे. माझ्यावर झालेल्या अन्यायाविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. सोमैयांनी न्यायालयात येऊन स्पष्टीकरण द्यावे, असे परब म्हणाले.
हे ही वाचा -महंत नरेंद्र गिरींचा गुदमरून मृत्यू; शवविच्छेदन अहवालात समोर
मुंबईकरांचा शिवसेनेवर विश्वास -
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने मुंबईत मराठी कट्टा सुरू केला आहे. मराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपकडून ही खेळी खेळली जात आहे. परब यांनी यावर प्रतिक्रिया देताना, निवडणूक प्रत्येकाला जिंकायची आहे. प्रत्येकजण प्रयत्न करतो आहे. आम्ही लोकांसमोर आम्ही केलेली कामे घेवून जाऊ.आजपर्यंत मुंबईकरांनी शिवसेनेवर विश्वास दाखवला आहे. शिवसेनेच्याच हातात मुंबई सुरक्षित राहील, ही भावना मुंबईकरांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळे मुंबईकर यावेळीही महापालिका शिवसेनेकडेच सोपवतील, याचा आम्हाला विश्वास असल्याचे परब यांनी सांगितले.