मुंबई : तुरुंगांमध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आता कैद्यांनाही लस दिली जाणार आहे. कोविन ऍपवर नोंदणी न करता कारागृहातील नोंदणीच्या आधारे कैद्यांना लस दिली जाणार आहे. त्यासाठी कारागृह व्यवस्थापनाला कस्तुरबा, नायर व जे.जे. रुग्णालय ही तीन रुग्णालये सूचवण्यात आल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
मुंबईत तुरुंगातील वयोवृद्ध, आजारी कैद्यांचेही होणार लसीकरण - bhaykhala jail
कारागृह व्यवस्थापनाला कस्तुरबा, नायर व जे.जे. रुग्णालय ही तीन रुग्णालये सूचवण्यात आल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
जेलमध्ये कोरोना -
मुंबईत गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यापासून कोरोना विषाणूचा प्रसार सुरू झाला. इमारती, झोपडपट्टीतील सामान्य नागरिक, वरिष्ठ अधिकारी, मंत्र्यांपासून चार भिंतीआड असलेल्या कैद्यांनाही कोरोनाची लागण झाली. कोरोनाची लागण होताच सोशल डिस्टनसिंगचे पालन व्हावे, इतर कैद्यांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून काही कैद्यांना कोरोना सेंटरमध्ये हलविण्यात आले. ऑर्थर रोड येथील तुरुंगाची क्षमता ८०० कैद्यांची असून सध्या या ठिकाणी ४ हजारांहून अधिक कैदी आहेत. तर भायखळा येथील कारागृहात दोन हजार कैदी असल्याचे समजते.
पोलीस बंदोबस्तात लसीकरण -
मुंबईत पुन्हा कोरोनाचा प्रसार वाढला आहे. कोरोनाचा प्रसार पुन्हा तुरुंगातही होण्याची शक्यता आहे. तुरुंगात क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण असल्याने कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता आहे. त्यासाठी ६० वर्षांवरील वयोवृद्ध व ४५ ते ५९ वयातील गंभीर आजार असलेल्या कैद्यांना कोरोनावरील लस देण्यात येणार आहे. कैद्यांना कारागृह प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात कस्तुरबा, नायर अथवा जे.जे. रुग्णालय या ठिकाणी आणल्यास त्यांना लस टोचली जाईल. तसेच लस टोचल्यानंतर किमान अर्धा तास त्या कैद्यास निरीक्षणाखाली ठेवण्यात येईल. काही त्रास जाणवला नाही तर कारागृहाच्या पोलीस बंदोबस्तात पुन्हा कारागृहात रवानगी करण्यात येईल. तसेच पुढील लसीकरणाची तारीख व वेळ त्याच वेळी कळवण्यात येईल, असेही काकाणी यांनी सांगितले.