मुंबई -प्रदूषण रोखण्यासाठी केंद्र सरकार इलेक्ट्रिक गाड्यांना प्रोत्साहन देत असल्यामुळे इलेक्ट्रिक वाहन खरेदीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे भारतीय रेल्वेकडूनसुद्धा पर्यावरणपूरक चळवळीत भाग घेऊन रेल्वे स्थानकावर इलेक्ट्रिक वाहनांसाठी ई- चार्जिंग पॉईट सुविधा देण्याची सुरुवात केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक 18 वर आणि ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर इलेक्ट्रिक वाहनांसाठी ई- चार्जिंग पॉईट उभारण्यात आले आहे.
शिवाजी सुतार - मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे इलेक्ट्रिक वाहन चालकांना होणार फायदा-
मध्य रेल्वेकडून नेहमीच प्रवाशांच्या सुविधेसाठी अनेक योजना सुरू केलेले आहे. तसेच पर्यावरण संरक्षणासाठी प्रयत्न सुद्धा करण्यात येत असून मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि ठाणे रेल्वे स्थानकावर टाटा पावर आणि मध्य रेल्वेच्या संयुक्त विद्यमाने इलेक्ट्रिक वाहनांसाठी ई- चार्जिंग पॉईंट बसवण्यात आला आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या महसुलात वाढ होणार असून याचा फायदा इलेक्ट्रिक वाहन चालकांना होणार आहे.
पाच वर्षांचा करार-
टाटा पावर आणि मध्य रेल्वेच्या इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग पॉईंटसाठी पाच वर्षाचा करार झालेला आहे. या करारातून मध्य रेल्वेला प्रत्येक चार्जिंग पॉईंटवरून प्रति वर्ष एक लाख रुपयांचा महसूल रेल्वेला मिळणार आहे. सध्या हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर सुरू केलेला आहे. हा प्रकल्प यशस्वी झाल्यास तरी रेल्वे स्थानकात ई चार्जिंग पॉईटची सुविधा देण्यात येणार आहे
रेल्वेला मिळणार महसूल-
भारतीय रेल्वेत महसूल वाढविण्यासाठी रेल्वेमंत्र्यांनी न्यू इनोव्हेटिव्ह नॉन फेअर रेव्हेन्यू आयडीयाज स्कीम (एनआयएनएफआरआयएस) आणली आहे. यामार्फत महसूल वाढविण्यासाठी अनेक योजना राबवणे सुरु केले आहे.त्यातील एक योजना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि दादर रेल्वे स्थानकावर डिजीटल लॉकर सुविधानंतर आता इलेक्ट्रिक वाहनांसाठी ई- चार्जिंग पॉईट सुरू केले आहे. त्यामुळे यातून रेल्वे महसूलसुद्धा मिळणार आहे.
इतरही रेल्वे स्थानकात सुरू होणार-
मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी यांनी ईटीव्ही भारतला सांगितले की, सीएसएमटी रेल्वे स्थानक आणि दादर रेल्वे स्थानकावर इलेक्ट्रिक वाहनांसाठी ई- चार्जिंग पॉईंट सुविधा सुरू केली आहे. वाहन चालकांना मुभलक दरातही सुविधा घेता येणार आहे. तसेच येणाऱ्या काळात मुंबई आणि उपनगरातील प्रमुख रेल्वे स्थानकावर लवकरच ई- चार्जिंग पॉईंट सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहेत.