मुंबई - कुख्यात गुंड अरुण गवळी याने उरलेले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी भायखळ्यातील दगडी चाळीतील गरजू कुटुंबीयांना मदत केली आहे. गवळी सध्या पॅरोलवर बाहेर आहे. मात्र, राजकीय अस्तित्व नामशेष झाल्यानंतर त्याने काही सामाजिक कार्यक्रम हाती घेतल्याचे चित्र आहे.
अस्तित्व टिकवण्यासाठी लॉकडाऊनमध्ये अरुण गवळीची जनतेला मदत! शहरातील गवळी टोळी संपली. तसेच निवडणुकीत पराभव पत्कारावा लागल्याने त्याचे राजकीय वजन कमी झाले. यानंतर सध्या पॅरोलवर बाहेर असलेल्या अरुण गवळीने दगडी चाळीतील लोकांना जीवनावश्यक गोष्टींचा पुरवठा केला आहे.
भायखळा परिसरातही कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. त्यामुळे या ठिकाणचा काही परिसर प्रतिबंधित करण्यात आला आहे. जीवनावश्यक वस्तूंसाठी नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून दगडी चाळीतील अनेक कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप गवळीसह त्याच्या कुटुंबीयांनी केले आहे.
भायखळ्याच्या दगडी चाळीत रोजंदारीवर काम करणाऱ्या नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालंय. यामुळे सोशल डिस्टनचे नियम पाळून पॅरोलवर असलेल्या गवळीने या परिसरातील नागरिकांना मदत पुरवली आहे. या चाळीतील 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या वरिष्ठ नागरिकांना तसेच अन्य गरजू कुटुंबीयांना किमान 1 महिना पुरेल इतके जीवनावश्यक वस्तूंचे कीट तयार वाटप करण्यात आले आहे.