मुंबई - सुईपासून अन्नधान्य-औषधांपर्यंत सर्व काही वस्तू आजकाल ऑनलाइन मिळत आहेत. मात्र त्याचवेळी राज्यात प्रतिबंधित असलेल्या वस्तू-पदार्थांची विक्रीही राजरोसपणे ऑनलाइन पद्धतीने होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ई-कॉमर्समधील आघाडीच्या अमेझॉन-फिल्पकार्ट कंपन्यांकडून प्रतिबंधित तंबाखुजन्य पदार्थांची विक्री केली जात आहे. याची गंभीर दखल अन्न आणि औषध प्रशासना (एफडीए)ने घेतली आहे. त्यानुसार या दोन्ही कंपन्यांना नोटीस बजावण्यात आल्याची माहिती अभिमन्यू काळे, आयुक्त, एफडीए यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली आहे. तर या नोटिशीद्वारे कारवाईचा इशारा दिला आहे.
2012पासून राज्यात गुटखा बंदी
तरुणाई अगदी शाळकरी मुले गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनांच्या आहारी गेली आहे. यातून तोंडाचा कर्करोग आणि इतर आजार बळावत आहेत. ही बाब लक्षात घेत राज्य सरकारने 2012मध्ये अन्न आणि मानके कायदा 2006अंतर्गत गुटखा तसेच तंबाखूजन्य पदार्थ-सुगंधित सुपारीवर बंदी घालण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. तर असा निर्णय घेणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरले. या निर्णयानुसार राज्यात या पदार्थांच्या विक्री-उत्पन्नावर बंदी आहे.
परराज्यातून प्रतिबंधित पदार्थ येत असतानाच आता ऑनलाइनही उपलब्ध
राज्यात गुटखा-तंबाखूजन्य पदार्थ-सुगंधित सुपारी यावर बंदी असून या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात एफडीएकडून कारवाई करण्यात येते. कारण राज्यात बंदी असली तरी शेजारच्या राज्यात अशी बंदी नसून गुटखा तस्कर या राज्यातून छुप्या पध्दतीने प्रतिबंधित पदार्थ आणून विकत आहेत. याला 100 टक्के आळा घालण्यात एफडीएला 100 टक्के यश आलेले नाही. अशात आता चक्क ऑनलाइन प्रतिबंधित पदार्थांची विक्री होत असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. यामुळे आता यावर देखील आळा घळण्याचे आव्हान एफडीएसमोर उभे ठाकले आहे.