महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Notice to Praveen Darekar : 'मजूर' आहात हे स्पष्ट करण्यासाठी प्रवीण दरेकर यांना सहकार विभागाची नोटीस

मुंबै बँकेच्या (Mumbai Bank) संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी (Election of Board of Directors) विधान परिषद विरोधी पक्ष नेते (Legislative Council Opposition Leader) व मुंबै बँकेचे विद्यमान अध्यक्ष प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी मजूर संस्था प्रवर्गातून (Labor Organization Category) अर्ज दाखल केला आहे. कोट्यवधींची संपत्ती असलेले प्रवीण दरेकर 'मजूर' कसे ठरु शकतात, असा प्रश्न उपस्थित करत सहकार विभागाने त्यांना नोटीस बजावली आहे.

Praveen Darekar
प्रवीण दरेकर

By

Published : Dec 15, 2021, 11:53 AM IST

मुंबई:मुंबै बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक २ जानेवारी २०२२ रोजी होणार आहे. यात बँकेचे विद्यमान अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी मजूर संस्था प्रवर्गातून अर्ज दाखल केला आहे. कोट्यवधींची संपत्ती असलेले प्रवीण दरेकर 'मजूर' कसे ठरु शकतात, असा प्रश्न उपस्थित करत सहकार विभागाने त्यांना नोटीस बजावली आहे. तसेच २१ डिसेंबर रोजी विभागीय सहनिबंधक कार्यालयात येऊन म्हणणे मांडण्याबाबत नमूद करण्यात आले आहे.

अनेक वर्ष याच प्रवर्गातून अध्यक्ष
प्रविण दरेकर यांनी यापूर्वीही बरीच वर्षे मजुर संस्थेचे प्रतिनिधी म्हणूनच बँकेवर अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. दरम्यान आताही त्यांनी मजूर संस्थेमार्फत मुबै बँक निवडणुकीसाठी अर्ज भरला आहे. पण याबाबत आक्षेप घेत तक्रार करण्यात आली आहे. या अनुषंगाने त्यांना सहकार विभागाने नोटीस बजावली आहे. या नोटिशीत आपण मजूर आहात की नाही? अशी विचारणा करण्यात आली आहे.

काय सांगतो नियम
मजूर संस्थेच्या नियमानुसार मजूर व्यक्ती म्हणजे प्रत्यक्ष अंगमेहनतीचे व शारिरीक श्रमाचे काम करणारा व्यक्ती.तिचे उपजीविकेचे साधन मजुरीवर अवलंबून असले पाहिजे. दरेकर यांनी दाखल केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात आपल्या कुटुंबाची स्थावर मालमत्ता २ कोटी ९ लाख रुपये असल्याचे दाखवले आहे. दुसरीकडे विधान परिषद विरोधी पक्षनेते म्हणून त्यांना २ लाख ५० हजार मानधन मिळत आहे. त्यामुळे ते प्रथमदर्शनी मजूर असल्याचे दिसून येत नाही असे या नोटीसीत नमूद आहे.

राजकारण्यांकडून नियमांना बगल
सहकारी बँकांमधील कारभार पारदर्शक व्हावा, यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेककडून प्रयत्न केले जातात. मात्र, राजकारण्यांकडून या नियमांना सोईस्कररित्या बगल दिली जाते. मुंबै जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत याचे प्रत्यंतर दिसत आहे. जानेवारी महिन्यात मुंबै बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक होत आहे. यासाठी मुंबै बँकेचे विद्यमान अध्यक्ष दरेकर यांनी अर्ज केला आहे. मात्र, त्यांनी हा अर्ज मजूर संस्था प्रवर्गातून दाखल केल्याने त्यांच्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. सहकार सुधार पॅनेलचे अंकुश जाधव, संभाजी भोसले यांनी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे याविषयी आक्षेप नोंदवत याविरोधात तक्रार केली होती.


प्रसाद लाडही निवडणुकीच्या रिंगणात
या निवडणुकीत भाजपचे प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड मैदानात उतरले आहेत. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रसाद लाड यांनी नुकतीच मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी मुंबै बँकेच्या निवडणुकीत सहकार्य करण्याची विनंती केली होती. आतापर्यंत प्रवीण दरेकर, आनंदराव गोळे आणि प्रसाद लाड यांच्याविरोधात एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. त्यामुळे या तिघांची संचालकपदी बिनविरोध निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. उर्वरित 18 उमेदवारांचीही बिनविरोध निवड व्हावी, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. परंतु आता सहकार विभागाने दरेकर यांना नोटीस पाठवल्याने या निवडणुकी संदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हेही वाचा :Omicron in Maharashtra : विनामास्क फिरणाऱ्या भाजप आमदाराला ठोठावला दंड

ABOUT THE AUTHOR

...view details