मुंबई - अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी मातोश्रीबाहेर येऊन हनुमान चालीसा पठण करण्याचे ( navneet rana ravi rana recite hanuman chalisa ) जाहीर आवाहन केले होते. त्या अनुषंगाने मुंबईभर वातावरण तापलेले असताना आज रवी राणा दाम्पत्य त्यांच्या खार येथील निवासस्थानी दाखल झाले. त्यांनी केलेल्या आवाहनाला शिवसेनेकडून सडेतोड उत्तर देण्यासाठी आज मुंबईत विविध ठिकाणी शिवसैनिक मोठ्या प्रमाणात जमा झाले होते. म्हणून कायदा व सुव्यवस्थेचा भंग होऊ नये या कारणासाठी खेरवाडी पोलिसांकडून आमदार रवी राणा यांना 149 ची नोटीस ( Khervadi Police Notice To Rana Couple ) देण्यात आली आहे.
हनुमान चालीसा पठण करण्यावरून वाद -मातोश्रीबाहेर येऊन हनुमान चालीसा पठण करण्यासाठी राणा दांपत्य यांनी दिलेले आव्हान शिवसैनिकांनी स्वीकारले होते. यावरून मागील तीन-चार दिवसांपासून वातावरण तापू लागले. आज पहाटे राणा दांपत्य मुंबईत दाखल झालंय. परंतु त्याचा थांगपत्ता कुणालाच नव्हता, शेवटी ते त्यांच्या खार येथील निवासस्थानी असल्याचे समजल्यानंतर खेरवाडी पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना 149 ची नोटीस दिली आहे.