मुंबई- मुंबईमध्ये कोरोना विषाणूचा ( Mumbai Corona Update ) प्रसार आटोक्यात आल्याने पालिकेने चार जम्बो कोविड सेंटर बंद ( Jumbo Covid Center ) केली आहेत. त्यानंतर आता पालिकेने ताब्यात घेतलेल्या 160 खासगी रुग्णालयात एकही कोविड रुग्ण उपचार घेण्यासाठी दाखल नसल्याने या रुग्णालयात आता नाॅन कोविड रुग्णांवर ( Non Covid Patient ) उपचार सुरू करण्यात येणार आहेत. यामुळे मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
बेड्स रिक्त -मुंबईमध्ये मार्च, 2020 मध्ये कोरोनाचा प्रसार सुरू झाला. पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांसह उपनगरीय रुग्णालये, नर्सिंग होम, कोविड सेंटर, दहा जम्बो कोविड सेंटरमधील ( Jumbo Covid Center ) बेडही कमी पडू लागले. त्यामुळे पालिकेने मुंबईतील 160 खासगी रुग्णालयांतील 80 टक्के बेड कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध करून शासकीय दराने शुल्क आकारण्याचे निर्देश दिले. सुरुवातीच्या दोन्ही लाटांमध्ये याचा मोठा उपयोग झाला. मात्र, तिसर्या लाटेत दैनंदिन रुग्णसंख्या 20 हजार इतकी विक्रमी नोंद होऊनही लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या 90 टक्क्यांपेक्षा जास्त होती. त्यामुळे पालिका आणि खासगी रुग्णालयातील बेड रिक्त ( Bed Available in Hospitals ) राहिले.