मुंबई -पश्चिम महाराष्ट्रात पडलेल्या मुसळधार पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मुंबईतील दूधपुरवठ्यावर देखील याचा परिणाम झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पूरस्थितीमुळे आवक कमी झाली आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा आणि कोकण येथे आलेल्या पुरामुळे पश्चिम महाराष्ट्रातील दूध संकलन आणि वाहतुकीवरही याचा परिणाम झाला आहे. वाहतूक पूर्वपदावर न आल्यास दूधाचा पुरवठा खंडित होऊ शकतो.
गोकुळच्या दूध संकलनात 76 हजार लीटरची घट!
गोकुळ दूध उत्पादक संघ आणि अमूलकडून 22 लाख लिटर दुधाचा पुरवठा होतो. कोल्हापूरच नाहीतर सांगली, सातारा येथून देखील काही दूध संघाकडून मुंबईला दूध पुरवठा होतो. मात्र सध्या कोल्हापूर सांगली आणि सातारा पूरस्थिती असल्यामुळे अनेक महामार्ग रस्ते बंद आहेत. या भागातील त्यामुळे गोकुळच्या दूध संकलनात 76,000 लीटरची काहीशी घट झाली आहे. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास दूध संकलनास आणखीन घट होऊ शकते.