महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईत डेल्टा प्लसचा एकही रुग्ण नाही; सुरेश काकाणी यांची माहिती - कस्तुरबा रुग्णालय

मुंबईत जिनोम सिक्वेसिंगमध्ये ३७६ नमुन्यांच्या चाचण्या करण्यात आल्या असून, यापैकी ३०४ नमुने हे ‘डेल्टा’ उप प्रकारातील कोविड विषाणूने बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. या दोन्ही टप्प्यातील नमुन्यांमध्ये अतिवेगाने लागण होणाऱ्या ‘डेल्टा प्लस’ या प्रकारातील एकही नमुना आढळून आलेला नाही, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.

No Delta Plus patients in Mumbai; Information of Suresh Kakani
मुंबईत डेल्टा प्लसचा एकही रुग्ण नाही; सुरेश काकाणी यांची माहिती

By

Published : Sep 17, 2021, 3:06 AM IST

मुंबई - कोरोना विषाणूचा प्रसार गेल्या दीड वर्षाहून अधिक काळापासून सुरू आहे. या काळात विषाणूने अनेक रूप बदलले आहेत. यासाठी मुंबईत जिनोम सिक्वेसिंग करण्यात आले. त्यात पहिल्या टप्प्यात ३७६ तर दुसऱ्या टप्प्यात १८८ नमुन्यांपैकी 'डेल्टा प्लस' विषाणूचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

डेल्टा प्लसचा एकही रुग्ण नाही -

नमुना चाचण्यांच्या विश्लेषणावर आधारित दुसऱ्या टप्प्यातील निष्कर्ष नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत. यानुसार ३७६ नमुन्यांच्या चाचण्या करण्यात आल्या असून, यापैकी ३०४ नमुने हे ‘डेल्टा’ उप प्रकारातील कोविड विषाणूने बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर इतर नमुन्यांमध्ये ‘नाईन्टीन-ए’ (19A) उप प्रकारातील २ आणि ‘ट्वेन्टी-ए’ (20A) उप प्रकारातील ४ नमुने आणि उर्वरित ६६ नमुने हे सर्वसाधारण कोविड विषाणूचे आहेत. विशेष म्हणजे पहिल्या व दुसऱ्या अशा दोन्ही टप्प्यातील नमुन्यांमध्ये अतिवेगाने लागण होणाऱ्या ‘डेल्टा प्लस’ या प्रकारातील एकही नमुना आढळून आलेला नाही, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.

कोविडचे नियम पाळा -

‘डेल्टा’ या उप प्रकारातील कोविड विषाणूची वेगाने होणारी लागण लक्षात घेता, ‘कोविड - १९’ विषाणू प्रतिबंधात्मक निर्देशांचे काटेकोर पालन प्रत्येकाने आपापल्या स्तरावर करण्याची आवश्यकता आहे. यामध्ये प्रामुख्याने ‘मास्क’चा सुयोग्य वापर, २ किंवा अधिक व्यक्तिंमध्ये सुरक्षित अंतर राखणे, नियमितपणे व सुयोग्य प्रकारे साबण लावून हात धुणे, गर्दी टाळणे यासारख्या उपाययोजना प्रत्येकाने पाळाव्यात, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने सातत्याने करण्यात येत आहे. तरी, सर्व मुंबईकर नागरिकांनी या उपाययोजनांची कटाक्षाने व कठोरपणे अंमलबजावणी करावी, असे विनम्र आवाहन काकाणी यांनी यानिमित्ताने पुन्हा एकदा मनपा प्रशासनाच्यावतीने केले आहे.

पहिल्या चाचणीतील विश्लेषण -

नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग लॅबमध्ये पहिल्या टप्प्यातील चाचण्यांचे निष्कर्ष गेल्या महिन्यात जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार कोविड बाधा झालेल्या एकूण १८८ रुग्णांच्या वैद्यकीय नमुन्यांची तपासणी करण्यात आली होती. ज्यामध्ये १२८ रुग्ण हे ‘डेल्टा’ या उप प्रकारातील कोविड विषाणूने बाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. तर इतर रुग्ण हे सर्वसाधारण कोविड विषाणूने बाधित असल्याचे निदर्शनास आले होते. या पहिल्या टप्प्यातील आकडेवारीबाबत विश्लेषणात्मक निष्कर्ष नुकतेच हाती आले असून यानुसार डेल्टा बाधीत १२८ नमुन्यांपैकी ९३ नमुने हे मुंबईतील रुग्णांचे होते. या ९३ रुग्णांपैकी ४५ नमुने हे पुरुष रुग्णांचे, तर ४८ नमुने हे स्त्री रुग्णांचे होते. तसेच या ९३ व्यक्तींपैकी ५४ व्यक्तींना म्हणजेच सुमारे ५८ टक्के व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासली. तर उर्वरित ४२ टक्के म्हणजेच ४० व्यक्तींमध्ये कोणतीही लक्षणे आढळून न आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासली नाही. तसेच या ९३ रुग्णांपैकी ४७ रुग्णांनी कोविड प्रतिबंधात्मक लस घेतली होती. ज्यापैकी २० व्यक्तींनी पहिला डोस, तर २७ व्यक्तींनी दोन्ही डोस घेतले होते. उर्वरित ४६ रुग्णांनी लस घेतली नव्हती. लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या केवळ ४ रुग्णांना ऑक्सिजन पुरवठ्याची गरज भासली. मुंबईतील सदर ९३ रुग्णांच्या निकटच्या संपर्कातील १ हजार १९४ व्यक्तींची कोविड चाचणी करण्यात आली. ज्यापैकी केवळ ८० व्यक्तींना कोविड बाधा झाल्याचे आढळून आले. तर १ हजार ११४ व्यक्तींना कोविड बाधा झालेली नसल्याचे आढळून आले.

कस्तुरबा रुग्णालयात लॅब -

बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या कस्तुरबा रुग्णालयात विषाणुंचे जनुकीय सूत्र निर्धारण वैद्यकीय प्रयोगशाळा म्हणजेच नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग लॅब कार्यरत आहे. या प्रयोगशाळेचे लोकार्पण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ४ ऑगस्ट २०२१ रोजी करण्यात आले होते. यानंतर सदर यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती. या वैद्यकीय प्रयोगशाळेमध्ये जिनोम सिक्वेसिंग करु शकणारे दोन यंत्र कार्यरत आहेत. अमेरिकेतील इलुम्निया या कंपनीने अमेरिकेतीलच अल्ब्राईट स्टोनब्रिज ग्रुप (ए. एस. जी. - बोस्टन) या संस्थेच्या माध्यमातून एकूण ६ कोटी ४० लाख रुपये किंमतीचे हे २ जीनोम सिक्वेसिंग यंत्र बृहन्मुंबई महानगरपालिकेला दान स्वरुपात दिले आहेत. विषाणूंचे जिनोम सिक्वेसिंग केल्याने, एकाच विषाणूच्या दोन किंवा अधिक उप प्रकारांमधील (प्रजाती) नेमका फरक ओळखता येतो. असा फरक ओळखू आल्यानंतर उपचार पद्धतीची नेमकी दिशा निश्चित करता येते. कस्तुरबा रुग्णालयातील जिनोम सिक्वेसिंग लॅबमध्ये एकाचवेळी सुमारे ३८४ वैद्यकीय नमुन्यांची तपासणी होऊन साधारणपणे ४ दिवसांच्या आत वैद्यकीय निष्कर्ष प्राप्त होऊ शकतात.

हेही वाचा -मुंबईत महिलांसाठी विशेष कोविड - 19 लसीकरण सत्र

ABOUT THE AUTHOR

...view details