मुंबई- मुंबईमध्ये गेल्या दीड वर्षात कोरोना विषाणूच्या दोन लाटा आल्या. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने रुग्णसंख्या कमी झाली आहे. विशेष म्हणजे मुंबईमधील दाटीवाटीने राहणाऱ्या झोपडपट्टी आणि चाळीमधील रुग्णांची संख्या नगण्य झाली आहे. यामुळे १४ ऑगस्टपासून सलग सात दिवस एकही झोपडपट्टी कंटेनमेंट झोन म्हणून घोषित झालेली नाही. एवढेच नाही तर धारावीसारख्या विस्तीर्ण झोपडपट्टीतील कोरोना शून्यावर आला आहे.
७ लाख ४० हजार नागरिकांना कोरोना -
मुंबईमध्ये मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. गेल्या दीड वर्षात कोरोनाच्या एकूण ७ लाख ४० हजार ६१२ रुग्णांची नोंद झाली आहे. या कालावधीत ७ लाख १९ हजार ३८१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. १५ हजार ९४१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के असून रुग्ण दुपटीचा कालावधी २ हजार ५२ दिवस इतका आहे. मुंबईत सध्या २ हजार ८५३ सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईत सध्या दिवसाला २०० ते ३०० नवे रुग्ण आढळून येत आहेत.
झोपडपट्ट्या, चाळी हॉटस्पॉट -
मुंबईमध्ये ६० टक्के नागरिक झोपडपट्टी आणि चाळीत राहतात. या विभागात दाटीवाटीने लोक राहत असल्याने कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होण्याची भीती होती. या भीतीनुसार धारावी, वरळी कोळीवाडा आदी भागातील झोपडपट्ट्या आणि चाळी कोरोनाचे हॉटस्पॉट बनल्या होत्या. मात्र पालिका प्रशासन, आरोग्य विभाग यांनी केलेल्या उपाययोजना आणि स्थानिक रहिवाशांनी दिलेली साथ यामुळे झोपडपट्ट्या आणि चाळी कंटेनमेंट झोन मुक्त झाल्या आहेत.
मुंबईमधील झोपडपट्ट्या कंटेनमेंट झोन मुक्त -
मुंबईमध्ये १३ ऑगस्टच्या आकडेवारीनुसार २ झोपडपट्या कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आल्या होत्या. १४ ऑगस्टला एकही झोपडपट्टी किंवा चाळ कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलेली नाही. त्यानंतर सलग सात दिवसात एकही झोपडपट्टी कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलेली नाही. मुंबईतून आतापर्यंत २ हजार ७९४ कंटेनमेंट झोन मुक्त झाले आहेत. मुंबईमधील झोपडपट्ट्या कंटेनमेंट झोन मुक्त झाल्या असताना २४ इमारती तर १०८७ मजले आजही सील करण्यात आलेले आहेत. यावरून मुंबईत इमारतीमध्ये आजही रुग्ण आढळून येत असल्याचे दिसत आहे.
धारावीचा शून्याचा विक्रम -
धारावी हि आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. धारावीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान १४ जून, १५ जून, २३ जून, ४ जुलै, ७ जुलै, १७ जुलै, ३ ऑगस्ट, ८ ऑगस्ट, ११ ऑगस्ट, १२ ऑगस्ट, १४ ऑगस्ट, १७ ऑगस्ट आणि १८ ऑगस्ट तब्बल १३ वेळा शून्य रुग्णांची नोंद झाली आहे. याआधी पहिल्या लाटेदरम्यान २४ डिसेंबर २०२०मध्ये पहिल्यांदा, २२ जानेवारी २०२१ला दुसर्यांदा, २६ जानेवारीला तिसर्यांदा, २७ जानेवारीला चौथ्यांदा तर ३१ जानेवारीला पाचव्यांदा, २ फेब्रुवारीला सहाव्यांदा धारावीत एकही कोरोना रुग्ण आढळला नाही.
काय आहे कंटेनमेंट झोन -
ज्या झोपड्पट्टी आणि चाळीत कोरोनाचे रुग्ण आढळून येतात त्याठिकाणी कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून तो विभाग सील केला जातो. त्या विभागातील नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर ये-जा करण्यास बंदी असते. तसेच मुंबईत ज्या इमारतीमध्ये ५ पेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळून येतात त्या इमारती सील केल्या जातात. ज्या इमारतीमध्ये एकाच मजल्यावर २ पेक्षा अधिक रुग्ण आढळून येतात ते मजले सील केले जातात.
पालिकेचे विशेष लक्ष -
मुंबईत सध्या इमारतींमध्ये कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. त्या इमारतींवर विशेष लक्ष दिले जात आहे. रुग्णांशी आरोग्य विभागातील कर्मचारी वेळोवेळी संपर्क ठेवत आहेत. सील केलेल्या इमारतींमधील रुग्ण आणि त्याच्या संपर्कांतील लोक बाहेर फिरत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा लोकांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
मुंबईतील स्थिती-
कंटेनमेंट झोन (चाळी, झोपडपट्ट्या) - ०
सील इमारती - २४
सील माजले - १०८७
राज्यात ५३ हजार ९६७ सक्रिय रुग्ण -
राज्यात ५ हजार ९१४ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६२ लाख २७ हजार २१९ कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.९९ टक्के एवढे झाले आहे. राज्यात ४ हजार ५७५ नवीन रुग्णांचे निदान झाले असून १४५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण १ लाख ३५ हजार ८१७ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी २१ लाख २४ हजार २५० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४ लाख २० हजार ५१० (१२.३२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३ लाख २० हजार ९०५ व्यक्ती गृहविलगीकरणामध्ये आहेत. राज्यात ५३ हजार ९६७ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत.